Sharad Pawar on Reuniting With Ajit Pawar: शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? अशी शंका वेळोवेळी उपस्थित केली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत अंदाज वर्तवले जात आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यासोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केलेल्या एका विधानाची चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांनी इंडियन एक्स्प्रेसला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऑपरेशन सिंदूरपासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी व पक्षीय राजकारण यासंदर्भात सविस्तर भाष्य केलं. यात इंडिया आघाडी सध्या शांत असून पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र करण्याची गरज शरद पवारांनी व्यक्त केली. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र येणार का? असं विचारलं असता त्यावर शरद पवारांनी त्यांची भूमिका मांडली.
काय म्हणाले शरद पवार?
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत आपलं काय मत आहे? अशी विचारणा केली असता शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उल्लेख केला. “आमचं म्हणाल तर आमच्या पक्षात दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. त्यातला एक मतप्रवाह सांगतो की आम्ही (अजित पवार गट व शरद पवार गट) पुन्हा एकत्र यायला हवं. तर दुसरा गट सांगतो की कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाता कामा नये. इंडिया आघाडीसोबत राहून विरोधकांची मोट पुन्हा एकदा बांधण्याचं मत या गटाचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांच्या या विधानानंतर त्यांच्या पक्षातील कोणत्या गटाची भूमिका अजित पवारांसोबत पुन्हा एकत्र येण्याची आहे? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, असं असताना इंडिया आघाडीच्या सध्याच्या अवस्थेबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.
इंडिया आघाडी सध्या शांत!
आपण आधीपासून इंडिया आघाडीत असलो, तरी इंडिया आघाडी सध्या शांत असल्याचं शरद पवार म्हणाले. “आम्हाला पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र करावं लागेल, आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल, तरुणांना पक्षात सामील करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर एकत्र मिळून काम करावं लागेल”, असं शरद पवार म्हणाले.
भाजपाला चांगला पर्याय तयार करावा लागेल – शरद पवार
दरम्यान, आपण इंडिया आघाडीसोबत जाणार की स्वतंत्रपणे लढणार? असं विचारलं असता शरद पवारांनी आपल्या पक्षाची भूमिका विरोधात राहण्याची असल्याचं नमूद केलं. “आमचा विचार हा विरोधी पक्षात काम करण्याचा आहे. भारतीय जनता पक्षाला सक्षम असा पर्याय तयार करावा लागेल”, असं त्यांनी नमूद केलं.
“सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यावा”
दरम्यान, सुप्रिया सुळेंबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली. “संसदेमध्ये विरोधी पक्षांमध्ये बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.