नरेंद्र मोदींचा ७५ वा वाढदिवस झाला. हा दिवस कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मी देखील त्यांना पत्र लिहिलं, अभिनंदन केलं. आम्ही सगळे जण यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात वाढलेले लोक आहोत. अशा प्रसंगांमध्ये आम्ही कुठलंही राजकारण आम्ही आणत नाही. अनेकांनी मोदींना शुभेच्छा दिल्या त्या योग्यच आहेत. माझा ७५ वा वाढदिवस होता त्यावेळी मोदी स्वतः आले होते. त्यावेळी त्यांनीही राजकारण आणलं नाही आम्हीही आणू इच्छित नाही. असं शरद पवार म्हणाले. दरम्यान या उत्तराच्या आधी एक किस्सा घडला तो महत्त्वाचा आहे.
शरद पवारांनी पत्रकारालाच विचारलं झोप झालीये ना तुमची?
पत्रकार परिषदेसाठी शरद पवार कोल्हापुरात आले तेव्हा पत्रकाराने प्रश्न विचारला शरद पवार साहेब, तुमचे शिष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस झाला, तुम्ही.. पत्रकार प्रश्न विचारत असतानाच शरद पवारांनी पत्रकाराला थांबवलं आणि विचारलं मोदी माझे शिष्य? झोप झाली आहे ना तुमची? हे पत्रकाराने विचारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
मी ७५ व्या वर्षी थांबलो नाही, त्यामुळे…
मी ७५ व्या वर्षानंतर मी थांबलो नाही त्यामुळे पंतप्रधानांनी थांबावं हे सांगायचा मला नैतिक अधिकार नाही. मी ८५ वर्षांचा आहे. ज्या काही जाहिराती आल्या त्यात वर्तमानपत्रांना आनंद असतो. एकनाथ शिंदेंनी जाहिराती दिल्या असतील ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे असं शरद पवार म्हणााले.
देवाभाऊच्या जाहिराती पाहिल्या, मी वेगळा विचार करतो..
देवाभाऊ जाहिराती पाहिल्या तर त्या खासगी दिसत आहेत. सरकारी जाहिराती फार कमी आहेत. देवाभाऊ म्हणून ज्या जाहिराती आल्या आहेत त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची भावना व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येकाचं कामच आहे, मात्र मी वेगळा विचार करतो असं शरद पवार म्हणाले. शरद पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, शेतकरी संकटात आहेत. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत. सोयाबीनसारखी पिकं उद्ध्वस्त झाली. शिवछत्रपतींकडे जेव्हा राज्य होतं तेव्हा दुष्काळ पडला होता. त्यावेळी दुष्काळ पडल्यानंतर पाऊस आला पण शेतकऱ्यांकडे साधनं नव्हती. त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या संपत्तीतून सोनं बाहेर काढलं आणि सोन्याचा फाळ केला आणि संदेश हा दिला की शेतकऱ्याची जमीन नांगरल्याशिवाय राहता कामा नये. त्यासाठी त्यांनी सोन्याचा फाळ करुन दिला. शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा होता हे समजतं आहे. आज घडीला अतिवृष्टी, जमीन वाहून जाणं, शेतकऱ्यांचं नुकसान असं सगळं झालं आहे. आता शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याची वाट पाहतो आहे. देवाभाऊंनी या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.