केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उद्या (रविवारी) परभणीच्या दौऱ्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करणार असून, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा असा त्यांचा कार्यक्रम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उद्याच जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत.
दुपारी ३ वाजता हेलिकॉप्टरने आगमन जाल्यावर मानवत तालुक्यातील मानोली, रत्नापूर भागात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील. गारपीटग्रस्त भागात पाहणीनंतर येथील श्री शिवाजी महाविद्यालय संकुलात राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्रमुख नेते, पदाधिकारी, जि. प., पं. स., बाजार समिती, पालिका-महापालिकेचे सदस्य आदींशी पवार चर्चा करणार आहेत. या वेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांनी केले आहे.
दरम्यान, पवार हे शिवाजी महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर परभणीतच मुक्काम करणार असून दौऱ्यात लोकसभा मतदारसंघाच्या मोच्रेबांधणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला एकत्र सांधण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उद्धव ठाकरे यांचाही दौरा
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उद्याच जिल्हय़ातील गारपीटग्रस्त भागाच्या पाहणीसाठी येत आहेत. पाथरी, मानवत, सोनपेठ आदी तालुक्यांत गारपिटीने मोठे नुकसान झाले. घनसावंगीहून पाथरीला आल्यावर सोनपेठ तालुक्यातील वाणीसंगम, पाथरी तालुक्यातील विटा, मुगदल व वाघाळामाग्रे केकरजवळा या गावांना ठाकरे भेटी देणार आहेत. मानवत तालुक्यातील मानोलीहून गारपीटग्रस्त भागाची पाहणी करुन ठाकरे परभणीहून गंगाखेडमाग्रे नांदेडला जाणार आहेत. सेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिल्रेकर, आमदार संजय जाधव, मीरा रेंगे, पक्षाचे जिल्हाप्रमुख आदी पदाधिकारी ठाकरे यांच्यासमवेत असतील.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2014 रोजी प्रकाशित
परभणीत गारपिटीची आज शरद पवार पाहणी करणार
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उद्या (रविवारी) परभणीच्या दौऱ्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करणार असून, काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा असा त्यांचा कार्यक्रम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उद्याच जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत.
First published on: 08-03-2014 at 05:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar uddhav thakare in parbhani