केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार जिल्हयातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ज्याच्या शेतात गेले होते, त्याच शेतकऱ्याने आज दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली. शरद पवार यांनी तीन दिवसांसाठी विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्य़ांमधील गावांचा दौरा केला होता.
त्यांनी यवतमाळ जिल्ह्य़ातील किन्हाळा (ता. कळंब) येथील थावरू राठोड या शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करताना थावरू राठोड यांच्यासोबत संवादही साधला होता.
या भेटीत पवार यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र कृषिमंत्र्याच्या आश्वासनावर तिळमात्रही विश्वास न दाखविता आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान थावरू राठोड यांनी त्याच शेतात विष प्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. अलीकडे पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतातील वाळत असलेल्या सोयाबीनला कोंबे फुटली आहे. त्यामुळे हातात आलेले पीक पूर्णत: वाया जाण्याच्या भीतीने राठोड यांनी जीवनयात्राच संपविली.