एक काळ असा होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांमध्ये विस्तव जात नव्हता. मात्र एप्रिल २०२५ मध्ये महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची एक मुलाखत घेतली. ज्यानंतर ठाकरे बंधू जवळ येण्याची समीकरणं वाढली. ५ जुलै २०२५ ला मराठी विषयाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकत्र आले. या दोघांची युती झाली आहे. महापालिका निवडणुका दोन्ही पक्ष बरोबर लढणार आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंची बाजू त्यांची वहिनी असलेल्या शर्मिला ठाकरे यांनी घेतली आहे. एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेता आणि न्याय मिळत नाही असं विधान शर्मिला ठाकरेंनी केलं आहे.

मुंबईत शर्मिला ठाकरेंचा पत्रकारांशी संवाद

शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते प्रभादेवी येथे नव्याने सुरु झालेल्या एका कॅफेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. मराठी माणूस, बिहार निवडणूक, अमित ठाकरेंवरील गुन्हा, गडकिल्ले यांवर भाष्य केले. बिहारमधील निवडणुकांच्या निकालावर बोलताना, हा विचार मराठी माणसाने केला पाहिजे. संकटात कोण उपयोगी असते हे पाहून मतदान केले पाहिजे. बिहारमध्ये मोठ्या संख्येने मतदान झाले आहे, पण आता लोकांनी विचार केला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून मतदान केले पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेनेबाबतही वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

“एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेत आहात आणि सर्वोच्च न्यायालयाला निकाल द्यायला तीन वर्षे वेळ नाही? आता पुढची सुनावणी जानेवारीत आहे तोपर्यंत निवडणुका निघून जातील मग सुनावणी घेऊन काय होणार?” अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरुन नाराजी व्यक्त केली.

२०२२ मध्ये शिवसेनेत फूट

२०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. ज्यानंतर ४१ आमदारांना बरोबर एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं. या बंडाची बरीच चर्चा झाली होती कारण शिवसेनेनेतील ही सगळ्यात मोठी फूट ठरली. एकनाथ शिंदे यांनी बंडाला उठाव असंच म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी या बंडाच्या विरोधात तक्रार दाखल केली, दरम्यान आता शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणावरुन शर्मिला ठाकरेंनी लगावला आहे.

बिहार निवडणुकीवरही भाष्य

खोटं बोला पण रेटून बोला असं काम सध्या सुरू आहे. बिहारमध्ये आकडेवारीनुसार ४ कोटी मतदार होते, आणि ७ कोटी मतदान झाले आहे. मुंबईसह राज्यातून ट्रेन भरून तिकडे गेल्या आहेत, ते तिकडे आणि इकडेही मतदान करणार. असाही आरोप शर्मिला ठाकरेंनी केला.