मंदार लोहोकरे, पंढरपूर
सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघ आणि शेकाप यांचे नाते गेली साठहून अधिक वर्षे सर्वत्र ओळखीचे होते. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या या गडाला अखेर यंदाच्या निवडणुकीत खिंडार पडले आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी तब्बल ११ वेळा विधानसभेचे सदस्यत्व होण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या या मतदारसंघात शिवसेनेने त्यांचा भगवा फडकवला आहे.
तब्बल अकरा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केल्यावर नव्वदीतील गणपतरावांनी यंदा आरोग्याच्या कारणास्तव निवडणुकीतून माघार घेत स्व:ताच्या नातवाला निवडणूक रिंगणात उतरवले. शेकापतर्फे सुरुवातीस भाऊ साहेब रुपनर यांची उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु ती ऐनवेळी बदलत गणपतरावांनी स्व:ताच्या नातवाला बहाल केली. यामुळे शेकापवर घराणेशाहीचा आरोप होऊ लागला. यामुळे शेकापच्या या लढाईला सुरुवातीलाच धक्के बसू लागले होते. त्यातच पुन्हा या मतदारसंघात नेहमी प्रचारात उतरणारा जातीचा मुद्दा यंदाही पुढे आला आणि या सर्व समिकरणांतून शिवसेनेचे शहाजी पाटील यांची सरशी होत सांगोल्यावर भगवा फडकला. विशेष म्हणजे शहाजी पाटील यांनी गणपतराव यांच्या विरोधात आजवर ६ वेळा निवडणूक लढवली असून त्यामध्ये त्यांना एकदाच विजय प्राप्त झाला होता. यंदा पाटील यांनी ७६८ चे मताधिक्य घेत शेकापच्या या गडाला खिंडार पाडून सेनेचा भगवा रोवला गेला आहे.
सांगोला हा तालुका दुष्काळ तसेच डाळिंब पिकासाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबरीने राजकारणात सांगोला विधानसभा हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाई गणपतराव देशमुख यांनी ११ वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करून एक विक्रम नोंदविला आहे. या मध्ये गणपतराव देशमुख १९७२ मध्ये दीड वर्षे तर १९९५ मधील ५ वर्षे एवढा काळ ते दूर होते. या मतदार संघात साधारणपणे ३५ टक्के धनगर तर ३० टक्के मराठा समाजाचे मतदार आहेत. उर्वरित ३५ टक्कय़ांमध्ये लिंगायत, माळी, दलित, मुस्लीम, लोणारी, ब्राह्मण व इतर समाजाची विभागणी आहे. यातील ढोबळमानाने ३५ टक्के इतर समाजाचे मतदार जिकडे फिरतील त्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. मात्र ९० वर्षांच्या गणपतराव यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
पुढील उमेदवार कोण? यासाठी गणपतराव यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र कार्यकर्त्यांनी गणपतराव यांना उभे राहण्याचा आग्रह केला. यावर त्यांनी मी जो उमेदवार देऊ तो स्वीकारा असे सांगितले. त्यानंतर भाऊ साहेब रुपनर यांचे नाव जाहीर झाले. मात्र यालाही विरोध झाल्याने अखेर गणपतराव यांचं नातू डॉ अनिकेत देशमुख यांचे नाव अंतिम झाले. मात्र या नावाला विरोधी उमेदवार शहाजी पाटील यांनी घराणेशाही सुरु झाली असा आरोप सुरु केला. त्याच बरोबरीने राष्ट्रवादीने ऐन वेळी शेकापला पाठिंबा जाहीर केला. मात्र त्या आधी राष्ट्रवादीने दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली होती. नाराज साळुंखे यांनी सेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे शेकापतर्फे नाव जाहीर झाले होते, असे भाऊ साहेब रुपनर यांनी सुद्धा सेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराची ताकद वाढली.
अवघ्या ७६८ मतांनी विजयी
मतमोजणी सुरु झाल्यावर डॉ. अनिकेत देशुमुख आणि शहाजी पाटील प्रत्येक फेरीमध्ये खालीवर होत होते. ही आघाडीची सापशिडी सुरु होती.त्यानंतर टपाली मतदानाची मोजणी झाली आणि अखेर सेनेचे शहाजी पाटील अवघ्या ७६८ मतांनी विजयी झाले. मात्र, शेकापाने फेरमतमोजणीची मागणी केली आणि यात बदल न होता सेनेचे उमेदवार विजयी घोषित केले. खरे तर शहाजी पाटील यांनी गणपतराव यांच्या विरोधात ६ वेळा निवडणूक लढविल्या. यात १९९५ मध्ये काँग्रेस पक्षाकडून लढले. मात्र अवघे १८२ मतांनी विजयी झाले. या वेळेस मताधिक्य वाढले असले तरी शेकापच्या गडाला खिंडार पाडण्यात यशस्वी झाले.