Shilpa Bodkhe Resign Shivsena : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातील पूर्व विदर्भातील महिला नेत्या शिल्पा बोडखे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फेब्रुवारी महिन्यांतच त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं होतं. परंतु, आठच महिन्यांत त्यांनी या पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्याबरोबर झालेला वाद आणि मित्र पक्षातील भूमिका यांमुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

शिवसेना पक्ष (एकनाथ शिंदे) का सोडला असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूप छान काम करत होते. त्यांच्या कामाला प्रभावित होऊन मी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातून बाहेर पडले. तिथून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेतच राहण्याचा विचार मी केला. म्हणून शिंदेंना साथ दिली. विकासाच्या दृष्टीकोनातून त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. महायुती सरकार हिंदुत्त्वावर चालत आहे. परंतु, मित्रपक्षात असलेले वाचाळवीर धर्माच्या नावाने धार्मिक तेढ निर्माण होईल, द्वेष पसरेल असं बोलतात. दुसऱ्या समाजाला बोलून त्यांचं मन दुखावण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे. हे माझ्या विचारधारेला पटणारं नाही. मी तेव्हाही त्यांचं समर्थन केलं नाही. यापुढेही करणार नाही. आपलं हिंदुत्त्व काय आहे, असं मला एकनाथ शिंदेंना विचारायचं आहे. आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन चालतो.”

मनीषा कायंदेंवर नाराज?

“येथे कष्ट करणाऱ्या, प्रामाणिक काम करणाऱ्याला महत्त्व नाहीय. मी जिथे राहते तिथे काम न करता बाजूच्या गावाला पाठवलं जातं. त्यांचं (मनीषा कायंदे) कतृत्त्व एवढं आहे की महायुती सरकार आलं तर त्या मुख्यमंत्री पदाच्याही दावेदार राहतील. पुढच्या पाच वर्षांत पंतप्रधानही बनतील. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व महान आहे”, अशी टीकाही शिल्पा बोडखे यांनी मनीषा कायंदे यांच्यावर केली.

हेही वाचा >> ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर शिल्पा बोडखे यांचा शिंदे गटात प्रवेश; मुख्यमंत्री म्हणाले, “विदर्भात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता कोणत्या पक्षात जाणार?

आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून मी काँग्रेस सोडली होती. कारण, मला महाराष्ट्रात येऊन कार्य करायचं होतं. परंतु, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष सोडण्याची कारणं वेगळी होती. विदर्भात काही लोकांना महिला नेतृत्त्व उभं करायचं नव्हतं म्हणून मी उध्दव ठाकरेंची साथ सोडली. परंतु, इथे माझे मित्र पक्षांशी पटत नाही. जिथे मी समाधानी राहीन अशा पक्षाकडून ऑफर आली तर, त्या पक्षात जाण्याचा विचार करेन”, असंही त्या पुढे म्हणाल्या.