राहाता: शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात दक्षिणा पेटीतील दानाची आठवड्यातून दोनदा मोजणी केली जाते. संस्थान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत ही मोजणी केली जाते. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही लेखा शाखेतील शिपायाने दक्षिणापेटीतील नोटांची विभागणी करताना कोणालाही न कळेल अशा पद्धतीने १ लाख २५ हजार ते १ लाख ५० हजार रुपयांची चोरी करून विश्वासघात केला. तसेच या व्यतिरिक्त अंदाजे ९१ हजार ५०० ते ९६ हजार ५०० रुपये चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात आज शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
बाळासाहेब नारायण गोंदकर (वय ५८, शिपाई लेखा शाखा, साईबाबा संस्थान, शिर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा प्रकार ४ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत तीनवेळा संस्थानच्या दक्षिणा मोजणी कक्षात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मंदिरातील दक्षिणा मोजणीसाठी गोंदकर हजर असायचा. या कक्षात पाचशे, दोनशे व शंभरच्या दक्षिणा पेटीतील प्राप्त नोटांचे विभागणीचे काम करताना कोणालाही न कळेल अशा पद्धतीने ५०० रुपयांचे एक बंडल चोरण्याच्या उद्देशाने प्रथम मांडीखाली लपविला, त्यानंतर पोटाचे जवळ पँटमध्ये लपविला व नंतर दक्षिणा मोजणी हॉलचे उत्तर बाजूच्या भिंतीलगत असणारे बंडल नोट काऊंटिंग मशिनमध्ये मागील बाजूस रक्कम लपविली. त्यानंतर ती रक्कम परस्पर दक्षिणा मोजणी हॉलमध्ये प्रवेश करून दुपारी चोरून नेली. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाला.
याबाबत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनुसार अविनाश कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी बाळासाहेब नारायण गोंदकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शखाली सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे करीत आहे. आरोपीला अद्याप अटक केली नसल्याची माहिती तपासी अधिकारी कायंदे यांनी दिली.