टोलविरोधी आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागल्यनंतर आज (सोमवार) ग्रामीण भागसह संपूर्ण कोल्हापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरातील बाजारपेठा आणि सर्व प्रमुख व्यवहार बंद असून रस्त्यावर शुकशुकाट आहे. शासनाने फसवणूक केल्याचा आरोप करीत शिवसेनेने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोल आकारणी होणार नाही, अशी ग्वाही देत बुधवारीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.
काही वेळात शहराच्या मध्यभागी असणा-या महापालिकेजवळील शिवाजी चौकात शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे तीन आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर आणि डॉ. सुजित मिणचेकर तसेच टोलविरोधी समिती निमंत्रक निवास साळुके व भाजपचे रामभाऊ चव्हाण या प्रमुख नेत्यांच्या उपस्थित टोलविरोधी रॅली निघणार आहे. टोल देणार नाही, टोल कायमचा हदद्पार करा अशा घोषणा देत ही रॅली शहराच्या मुख्य भागातून फिरेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  
टोलविरोधी झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी महापौर सुनिता राऊत, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर आणि डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह जवळपास दोन हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तणाव निर्माण करणे, प्रक्षोभक भाषणे करणे, सामाजिक शांतता भंग करणे असे गुन्हे  त्यांच्यावर नोंदवण्यात आले आहेत.
शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त असून सर्व प्रमुख व्यवहार बंद आहेत. रविवारी कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागून संतप्त नागरिकांनी फुलेवाडी व शिरोली टोल नाके पेटवून उद्ध्वस्त करीत आपल्या उद्रेकाचे दर्शन घडविले. हतबल पोलिसांसमोर अन्य नाक्यांचीही मोठय़ा प्रमाणात नासधूस करण्यात आल्याने दिवसभर शहरातील वातावरण धुमसत होते.