सोलापूर : गेल्या पाच वर्षांत राज्यात महायुती सरकारचा कारभार चालत असताना जे चांगले वाटले, त्याला मनापासून साथ दिली आणि ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्याला विरोध केला. भाजपला कधीही दगा देण्याचा प्रयत्न केला नाही. यापुढेही सत्तेत भाजपच्या जर काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्याबद्दल कोणताही मुलाहिजा न ठेवला उघडपणे खडेबोल सुनावण्याची ताकद शिवसेना बाळगून आहे, असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात स्पष्ट केले.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारार्थ कर्णिकनगरातील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. या सभेसाठी हजारोंचा जनसुदाय हजर होता. या सभेस सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख, जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, शिवसेनेचे समन्वयक मिलिंद नार्वेकर, भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, सेनेचे उमेदवार दिलीप माने आदी उपस्थित होते.
या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेताना सोबत शिवसेनेच्या बंडखोरांचाही बंदोबस्त करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याशी आजही काही मंडळी गद्दारी करतात. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करताना गद्दारांना कधीही थारा न देता त्यांचा बंदोबस्तच केला होता. आता सोलापुरात काही मंडळी शिवसेनेच्या भगव्याशी गद्दारी करीत आहेत. अशांना त्यांची जागा दाखवून द्यायचे आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार महेश कोठे यांच्यावर त्यांचा थेट नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.
आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविताना ठाकरे म्हणाले, की आम्ही जे जे चांगले करण्याचा प्रयत्न करतो, त्यात अडथळा आणण्याचे काम शरद पवार हे करीत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनीतब्बल ४५ वर्षे सत्ता भोगूनही सोलापूरसाठी काहीच केले नाही. मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, ऊर्जामंत्री अशी किती तरी मोठी सत्तापदे सोलापूरकरांच्या आशीर्वादाने मिळूनही शिंदे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही, अशा शब्दांत त्यांनी हल्ला चढविला. आता देशात व राज्यात राजकीय परिस्थिती बदलली असून पवार व शिंदे दोघेही आपल्या कर्माची फळे भोगत आहेत, अशीही टीका त्यांनी केली. या वेळी सोलापूरच्या विकासासाठी ठाकरे यांनी काही भरघोस आश्वासने दिली.