सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध होत असतानाच दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. विद्यार्थी तरुणांबरोबरच विविध क्षेत्रातील लोक रस्त्यावर आले. या आंदोलनांवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर ट्विट करून टीकास्त्र सोडले आहे. राऊत यांनी एक शेर ट्विट केला असून, “जे तुम्ही दडपून टाकण्याचा प्रयत्न करत होता, ते आता रस्त्यावर आलं आहे,” असं म्हटलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांपासून भाजपावर टीकेचे बाण सोडणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुनावलं आहे.
“तुमने जिस खून को मक्तल में दबाना चाहा,
आज वह कूचा-ओ-बाजार में ओ निकला है
जय हिंद!”
असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. जेएनयू आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांवर सरकार घेत असलेल्या भूमिकेवर राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे.

राऊत यांना नेमकं म्हणायच काय?

जे रक्त तुम्ही कत्तलखान्यात लपवण्याचा प्रयत्न केला, ते आज रस्त्यावर आलं आहे, असा या शेरचा मतितार्थ असून, जेएनयू व इतर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. पण, तरुण व नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारवर प्रेम न करताही देशावर प्रेम करू शकता –

राऊत यांनी शेर ट्विट करण्यापूर्वी थॉमस गोम्स यांचं वाक्य ट्विट केलं आहे. ‘तुम्ही सरकारवर प्रेम न करताही देशावर प्रेम करू शकता’ हे वाक्य ट्विट करून राऊत यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. मोदी सरकारकडून वारंवार राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित केला जात असतानाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे ट्विट केल्याचं दिसून येतं.