“शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या हिताचा आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. भाजपाला राज्यात अघोरी प्रयत्न करूनही आपला निर्णय लादता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता दिल्लीतही एकत्र जाऊ असं सांगितलं आहे,” असं सूचक विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
“महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. या राज्यात अघोरी प्रयत्न करूनही भाजपाला निर्णय लादता आले नाही. महाराष्ट्राच्या जनतेत त्यांच्याविषयी रोष आहे. तसंच महाराष्ट्राच्या मातीत पुण्य शिल्लक आहे म्हणून आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. देशाच्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे. शिवसनेनेच्या हाती राज्याची कमान जाऊ नये म्हणून भाजपाकडून अनेक अघोरी प्रयत्न करण्यात आले. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तो कधीही तुटणार नाही,” असं राऊत यावेळी म्हणाले.
“उद्यापासून राज्याचे मुख्यमंत्री असतील. ते आणि त्यांचे सहकारी राज्याचे निर्णय घेतील. माझी जबाबदारी पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कोणापुढेही झुकणार नाही. महाराष्ट्रानं देशाला नवा मार्ग दाखवला आहे. आमचं सूर्ययान २४ तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरक्षित उतरेल असं मी म्हटलं होतं. परंतु त्यावेळी लोकांनी चेष्टा केली. आता आमचं सूर्ययान सुरक्षितरित्या मंत्रालयात उतरलं आहे,” असं ते म्हणाले. “मी काही चाणक्य नाही. मी योद्धा आहे. शरद पवारही आता म्हणाले आपण दोघं दिल्लीत एकत्र जाऊ. यापूर्वी जेव्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यानंतर मी म्हटलं होतं की ते परत येतील. ते भाकित अगदी खरं ठरलं. शरद पवारांना समजण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील यापूर्वीच म्हणालो होतो. अजूनही थोडं काम बाकी आहे. ते लवकरच पूर्ण होईल,” असंही राऊत यांनी नमूद केलं.