Sanjay Raut on Eknath Shinde: राज्याचे वन मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यावरील वर्चस्वावरून अनेकदा खटके उडताना पाहिले गेले आहे. गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात संघर्ष दिसत असताना आता गणेश नाईक यांनी शिंदेंबाबत केलेल विधान चर्चेत आहे. “एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, पण कमावलेले टिकवता आले पाहिजे”, असे गणेश नाईक म्हणाले होते. त्यांच्या विधानाचा आधार घेत संजय राऊत म्हणाले की, शिंदेंना लॉटरी नाही तर मटका लागला होता.
संजय राऊत म्हणाले, “गणेश नाईक शिवसेनेच्या १९९५ च्या पहिल्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांचा राजकारणात उदय झाला नव्हता, तेव्हापासून नाईक राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. नाईक संयमी नेते आहेत. एकेकाळी आमचे सहकारी होते. ते पक्ष सोडून गेले असले तरी आजवर त्यांनी शिवसेना किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका केलेली नाही. उलट आम्ही अनेकदा त्यांच्यावर टीका केली आहे. पण त्यांनी कधी पलटवार केला नाही.”
“गणेश नाईक काल म्हणाले की, शिंदेंना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकारही एकेकाळी लॉटरी काढत असे. पण आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी आकडा मात्र लावला जातो. गणेश नाईक सभ्य आणि संस्कारक्षम नेते असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला. पण त्यांच्या डोक्यात मटका असेल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मटक्याबद्दलची माहिती देत असताना संजय राऊत म्हणाले की, मी पूर्वी गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले असल्यामुळे मला याबद्दलची माहिती आहे. “मटक्याचे आकडे सतत बदलत असतात. हे आकडे कुणालाही सांभाळता येत नाहीत. यांचा आकडा काढणारे दिल्लीत बसले आहेत. ते दिल्लीत जाऊन आकडा लावायचा प्रयत्न करत आहेत, पण आकडा लागत नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.