महानगरपालिका निवडणुकीत निम्म्या जागांची अपेक्षा बाळगून असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने ३८-३० अशा जागावाटपाचा प्रस्ताव दिला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा या निवडणुकीचे प्रभारी गजानन कीर्तिकर यांनी गुरुवारी येथे ही माहिती दिली. वर्तमानपत्रांद्वारेच हा प्रस्ताव आम्ही त्यांना देत असल्याचे स्पष्ट करतानाच महायुती होण्यात कोणतीच अडचण नाही असेही ते म्हणाले.
मनपा निवडणुकीतील इच्छुकांच्या मुलाखती शिवसेनेने आजपासून सुरू केल्या. आज पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १ ते २० मधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी ९० इच्छुकांना उमेदवारीचा दावा केला आहे. उर्वरित प्रभागांमधील इच्छुकांच्या मुलाखती उद्या न होता परवा (शनिवार) होणार आहेत. कीर्तिकर व स्थानिक नेत्यासंह मारुती साळुंके व सदाशिव सुर्वे (मुंबई) यांनी या मुलाखती घेतल्या. तीन प्रभागांत मुस्लिम उमेदवारांनीही शिवसेनेकडे उमेदवारी मागत आज मुलाखती दिल्या. त्यात पत्रकार रियाज शेख (प्रभाग १९) यांचाही समावेश आहे. माजी नगरसेवक तथा शहर सहकारी बँकेचे संचालक जयंत येलूलकर यांनीही (प्रभाग ११) पक्षाकडे उमेदवारी मागितली असून आज त्यांनी मुलाखतही दिली. या मुलाखतींच्या दरम्यान कीर्तिकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेना-भाजप-आरपीआय ही महायुती आहेच. नगरच्या मनपा निवडणुकीतही ती होईलच. त्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला, अन्य दोन्ही पक्षांना आम्ही तशी रीतसर निमंत्रणेही दिली. भाजपकडून अद्यापि अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र ते म्हणाले, भारिपने आजच त्यांच्या १२ जागांची यादी शिवसेनेकडे सादर केली आहे. आता पुन्हा भाजपशी चर्चा करणार आहोत. जागावाटपाची चर्चा स्थानिक पातळीवरच व्हावी असे वाटते, मात्र त्यात अडचणी आल्या तर वरिष्ठांच्या पातळीवर ही चर्चा होऊन योग्य तोडगा निघेल.
भाजपकडे सर्वच पक्षांचे लोक उमेदवारी मागत आहेत असे सांगून कीर्तिकर म्हणाले, शिवसेनेचे तसे नाही. शिवसेनेचे इच्छुक हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्तेच आहेत. भाजपनेही पक्षातील निष्ठावानांसाठी जरूर आग्रह धरावा, त्यात कोणती अडचण असणार नाही. मात्र उमेदवार आयात करू नये. स्थानिक पातळीवर सौदेबाजी करून पक्ष वाढत नाही. शिवसेनेच्या दृष्टीने निष्ठा हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. त्याला जातिपातीचा आधार दिला जाऊ नये. सर्वांना बरोबर घेऊन नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येक पक्षात एखादा टिकोजीराव असतोच असा टोमणा मारून युती टिकवण्याची जबाबदारी एकटय़ा शिवसेनेची नाही असेही कीर्तिकर म्हणाले. आमदार अनिल राठोड, पक्षाचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, महापौर शीला शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदी या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, या मुलाखतींमुळे चितळे रस्ता आज दिवसभर शिवसैनिकांनी फुलून गेला होता. येथील रहदारीलाही त्याचा मोठाच अडथळा झाला. इच्छुकांनी घोषणेबाजी, ढोल-ताशांच्या गजरात जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीचे दावे केले. इच्छुक व त्यांच्या समर्थकांमध्ये महिलांचीही संख्या मोठी होती. या पूर्ण परिसरात हा जमाव विस्तारला होता.