लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेत शेकापने उमेदवार दिला असला तरी याचा परिणाम जिल्हा परिषदेतील शेकाप-सेना युतीवर होणार नसल्याचा निर्वाळा मंगळवारी खासदार अनंत गीते यांनी केला आहे. त्यामुळे शेकापला त्यांची जागा दाखवण्याची भाषा करणारी शिवसेना बॅकफुटवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. माणगाव येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत गीते बोलत होते.
खासदारकी गेली तरी चालेल मात्र रायगड जिल्हा परिषदेवरील सत्ता जायला नको अशा भूमिकेपर्यंत आता रायगड जिल्ह्य़ातील शिवसेना आली आहे. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतून शेकापने स्वत:चे उमेदवार उभे करून शेकाप-सेना युती संपुष्टात आल्याचे जाहीर केले, खासदार गीते यांच्या कार्यप्रणालीवर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी टिकेचे आसूड ओढले, पाच वर्षांत गीते रायगडात फिरकलेच नाहीत, खासदार निधीतील कामातून मिळणाऱ्या टक्केवारीकडेच खासदारांचे लक्ष होते. असे टोमणे जयंत पाटील यांनी या वेळी लगावले होते. या टीकेनंतर शिवसेनेचा आत्मसन्मान जागा होईल आणि जिल्हा परिषदेतील युती संपुष्टात येईल, अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र तरीही शिवसेनेने शेकापकडून असलेल्या अपेक्षा सोडलेल्या नाहीत. तुम्ही काही करा मात्र जिल्हा परिषदेतील युती कायम ठेवा या निर्णयापर्यंत शिवसेना आली आहे. त्यामुळे शिवसेना लोकसभा निवडणुकीपूर्वीच बॅकफुटवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
माणगाव येथे झालेल्या सेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीनंतर खासदार अनंत गीते यांनी रायगड जिल्हा परिषदेतील शेकाप-सेना युती अभेद्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीत शेकापने उमेदवार दिल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मात्र आमची मुख्य लढाई ही राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या बरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तटकरे यांनी केलेला भ्रष्टाचार हाच या निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे गीते यांनी सांगितले. आघाडीच्या मंत्र्यांनी शासकीय तिजोरीवर मारलेला डल्ला त्यांना भोवणार असल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत आपल्याला जास्त मताधिक्य मिळेल असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.
या बैठकीला उत्तर रायगड जिल्हा प्रमुख बबन पाटील, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, आमदार भरत गोगावले, प्रभाकर मोरे, मनोहर भोईर, संजय जांभळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.