अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाकरे गटाला पुन्हा भागदाड पाडण्याची तयारी केली आहे. त्यासाठी शनिवारी पक्षाचे संपर्कमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत नगर शहरात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात नगर शहरातील काही माजी नगरसेवक तसेच श्रीगोंदा व पाथर्डीतील पंचायत समितीचे माजी सदस्य पक्षप्रवेश करणार आहेत.
शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव व जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी ही माहिती दिली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी बाबुशेठ टायरवाले, संभाजी कदम, संजय शेंडगे, राम नळकांडे, बाळासाहेब बोराटे तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते. शनिवारी दुपारी २ वा. माउली सभागृहात मेळावा होणार आहे. मंत्री शंभूराजे देसाई निवडणुकीची रणनीती यावेळी स्पष्ट करतील. यावेळी अनिल शिंदे व सचिन जाधव यांनी सांगितले की, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे. यादृष्टीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संपर्कमंत्र्यांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत सूचना दिल्या आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांपर्यंत त्या पोहोचवल्या जातील.
मित्र पक्षांचे पदाधिकारी नकोत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर की महायुतीच्या माध्यमातून लढवायच्या याबाबत पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल. सध्या तरी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र ऐनवेळी स्वबळाचा नारा झाला तर त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र महायुतीमधील संकेतानुसार मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा एकमेकांच्या पक्षात प्रवेश होणार नाही, असे सचिन जाधव यांनी सांगितले.
माजी आमदार मुरकुटे यांचा प्रवेश होणार
श्रीरामपूरचे माजी आमदार व अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे, श्रीरामपूरचे माजी नगरसेवक संजय छल्लारे शनिवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. मुरकुटे यापूर्वीही एकत्रित शिवसैनिक होते व त्यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व नंतर तेलंगणातील ‘बीआरएस’ पक्षात प्रवेश केला होता. श्रीरामपूरमध्ये ते लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून अस्तित्व ठेवून आहेत.