शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असं आता रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनीही म्हटले आहे. शिवसेनेने समसमान फॉर्म्युला समोर आणून अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. हा प्रस्ताव भाजपाला मान्य होईल असे वाटत नाही त्यापेक्षा शिवसेनेने पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे आणि आदित्य ठाकरेंना त्या पदी बसवावे अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर भाजपाने अशी ऑफर दिली तर शिवसेना ही ऑफर स्वीकारेल असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब बोलून दाखवली.

महायुतीला जनतनेने निवडलं आहे, त्या जनमताचा आदर दोन्ही पक्षांनी करावा आणि शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे. आपण याबाबत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत असंही आठवलेंनी म्हटलं आहे. सत्तास्थापनेचं काय करायचं याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसात होईल असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. निवडणूक निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही पक्षांची युती आहेच त्यामुळे महायुतीचं सरकार येणार हे उघड आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हा पेच अद्याप सुटलेला नाही. कारण शिवसेनेने मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी हवं अशी मागणी केली आहे.

भाजपा आणि शिवसेना हे विधानसभा निवडणूक एकत्र लढले होते. या निवडणुकीत २२० के पार असा नारा भाजपाने दिला होता पण तो काही प्रत्यक्षात आला नाही. भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला ५६ जागांवर. बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाल्याने आणि शरद पवारांनी विरोधकांच्या वतीने नेटाने सामना दिल्याने भाजपाला अपेक्षित होते तसे निकाल समोर आले नाहीत. असं असलं तरीही जनमताचा कौल हा महायुतीच्याच बाजूने आहे. अशात आता शिवसेनेची भूमिका सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची ठरते आहे. मुख्यमंत्रीपदात अर्धा वाटा शिवसेनेने मागितला आहे, अडीच वर्षांसाठी भाजपाकडे मुख्यमंत्रीपद आणि अडीच वर्षांसाठी शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद अशी शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. मात्र ही मागणी मान्य होईल असे वाटत नाही तेव्हा शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे अशी अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली आहे.