Uddhav Thackeray : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पक्षासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) मुंबई महापालिका जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘शिवसेना जिवंत आहे, शिवसेना तलवारीसारखी धारदार आहे. तळपती तलवार लांबून बघा, पण हात लावायच्या भानगडीत पडू नका’, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमकी कोणाकडे होता? याबाबत आता चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“सध्या मोठमोठे राक्षस उभे राहिले आहेत. विकास झालाच पाहिजे, पण टॉवर मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत. मोकळ्या जागा संपवल्या जात आहेत. मुलांना खेळण्यासाठी मैदाने देखील शिल्लख राहत नाहीत, किंवा आपले सण, उत्सव साजरे करण्यासाठी देखील जागा राहत नाहीये. मग आम्ही उत्सव कुठे साजरे करायचे?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“आता तुम्ही सर्वजण मंडळाचे कार्यकर्ते आहात. तुम्ही मंडप वैगेरे टाकला की आम्ही मिरवायला आलोच तिकडे. तुम्ही आमचंही स्वागत करता. पण मी आता फार मोचक्या मंडळांना भेटी देतो. अन्यथा आधी मी इकडे खूप फिरायचो. आजही काही लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात साहेब मंडळाला ७५ वर्ष झाले आहेत, आमच्याकडे या. मग यावसं वाटतं. पण आल्यानंतर अडचण अशी होते की एकाकडे आलं की लगेच दुसऱ्याकडेही जावं लागतं. कारण हे प्रेम आहे. मंडळं पळवापळवीची गोष्ट वेगळी. पण प्रेम विकलं जाऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

“आज जर कोणाला वाटत असेल की शिवसेनेकडे काय आहे? तर काय आहे हे काल देखील संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेलं आहे. शिवसेना ही जिवंत आहे, शिवसेना ही तलवारीसारखी धारदार आहे, हात लावायला जाऊ नका. लांबून तळपती तलवार पाहा. मात्र, या तलवारीला हात लावायच्या भानगडीत पडू नका”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

“कोणाला वाटत असेल की आता सत्ता नाही, महापालिका नाही. कारण हे निवडणुका घेऊ शकत नाहीत. ज्या निवडणुका घेतल्या, त्यामध्ये मतांची चोरी कशी केली? हे काल-परवा समोर आलं. लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल कसा लागला? हे देखील राहुल गांधींनी उघड केलं. मग अशा पद्धतीने चोरून आणलेली सत्ता तुम्हाला काय न्याय देणार? त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. शिवसेना जनतेला न्याय मिळू देण्यासाठी एक क्षण देखील डगमगणार नाही. शिवसेना तुमच्या बरोबर कायम असेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.