विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलखोल महा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वरळी डोम सभागृहात संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे वकील असिम सरोदे, रोहित शर्मा, त्यानंतर अनिल परब, संजय राऊत आणि शेवटी उद्धव ठाकरे यांची भाषणे झाली. उद्धव ठाकरे यांनी शाब्दिक चिमटे काढत भाजपावर शरसंधान साधले. देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपविण्याचा कट भाजपाने आखला असून त्याची वाच्यता खुद्द भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली असल्याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. तसेच त्यांच्या आधी अध्यक्ष असलेल्या अमित शहा यांनी २०१४ आणि २०१९ साली लोकसभेसाठी शिवसेनेशी युती केली तेव्हा हा पक्ष माझा नाही, हे त्यांना ठाऊक नव्हते का? त्यावेळी युती करताना लाज कशी नाही वाटली? अशा शब्दात भाजपावर टीकास्र सोडले.

“माझ्याकडून चुकीचं कृत्य…”, ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकरांचं वक्तव्य

रामशास्त्री, डॉ. आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात लोकशाहीचा खून

उद्धव ठाकरे म्हणाले, पक्ष गिळंकृत करण्याच्या कटाची सुरूवात २०२२ साली झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की, या देशात भाजपा हा एकच पक्ष राहणार. बाकी कोणतेही पक्ष नसतील. ही त्याची सुरुवात होती. त्यानंतर ईडी, निवडणूक आयोग, सीबीआय आणि विधानसभा अध्यक्षांचा लवाद हे सर्व प्रकार सुरू झाले. एकप्रकारे ‘गारदी’ निर्माण करण्याचे कामच केले गेले. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न केला. मग राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हेच झाले. संपूर्ण देशात हाच प्रकार सुरू आहे. सगळेच पक्ष संपवून एकच पक्ष राहणार हे एखादा अध्यक्ष उघडपणे म्हणतो, तेव्हा देशात लोकशाही आहे का? हा प्रश्न उभा राहतो. निवडणूक आयोगाने या विधानावर कारवाई का नाही केली? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

Maharashtra Breaking News Live: “लबाडाने..नाही लवादाने जो निकाल दिला…”, भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांना टोला!

महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देत नाही

कायदे पंडीत रामशास्त्री प्रभुणे, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्याच महाराष्ट्रापासून भाजपाने लोकशाहीचा खुन करण्यास सुरुवात केली, याचे मला वाईट वाटते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. “याच महाराष्ट्राच्या मातीत ही अवदसा जन्माला आलेली पाहायला मिळत आहे. रामशास्त्री, डॉ. आंबेडकर या मातीत जन्मले, तसे लोकशाहीचे हत्यारेही याच मातीत जन्मले आणि त्यांना त्यांची महाशक्ती साथ देत आहे. पण त्यांना या महाराष्ट्राच्या मातीचा पराक्रम माहिती नाही. ही माती गद्दारंना थारा देत नाही, तर गाडून टाकते”, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मग तुम्ही २०१४ साली माझ्याकडे पाठिंबा का मागितला?

“राहुल नार्वेकर यांनी १९९९ च्या शिवसेनेच्या घनटेचा उल्लेख करून शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, जर १९९९ ची घटना प्रमाण मानायची होती तर २०१४ साली मोदींनी मला पाठिंबा देण्यासाठी का बोलावले? तेव्हा मोदीजी म्हणाले होते की, “अब बालासाहेब नहीं रहे, तो अब मैं उद्धव जी से बात करता हूँ…” मग मी काय असाच होतो का? २०१९ साली भाजपाचे तेव्हाचे अध्यक्ष अमित शाह युतीची चर्चा करण्यासाठी माझ्याकडे कशासाठी आले? देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षं जे मुख्यमंत्रीपद उबवलं, ते कुणाच्या पाठिंब्यावर?”, असेही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.

उद्धव ठाकरे आक्रमक! “एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकरांना माझं खुलं आव्हान आहे मैदानात सुरक्षा न घेता या आणि…”

असा घरगडी पाहिला नाही

“२०१४ साली लोकसभेला माझा पाठिंबा घेतला आणि ऑक्टोबरला युती तोडली. त्यानंतर २०१९ साली पुन्हा युती केली. तेव्हा तुम्हाला ती माझी शिवसेना आहे, हे माहीत नव्हतं का? आता जे मिंधे तिकडे गेले आहेत, त्यांना कुणी पदं दिली होती? आता ते (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) सांगतात की, मी घरगड्या सारखा वागवतो. असा घरगडी मी कधी पाहिला नाही, ज्याची पंचताराकिंत शेती आणि शेतात दोन दोन हॅलिपॅड आहेत. त्यामुळे आमच्यावर झालेले आरोप थोतांड आहे आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितेल.