Sanjay Raut on Manikrao Kokate: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहातच मोबाइलवर गेम खेळताना आढळल्यानंतर आता विरोधक यावर टीका करत आहेत. यंदाचे पावसाळी अधिवेशन बऱ्याच कारणांसाठी गाजले. शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर अधिवेशन संपताच आता माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आला आहे. महायुतीच्या सरकारमध्ये तीन पक्षांचे मंत्री असून भाजपा वगळता इतर दोन पक्षातील अनेक मंत्र्यांवर विविध कारणांमुळे टीका झाली आहे. आता मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असा दावा शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रात अमानुष पद्धतीने राज्यकारभार सुरू आहे. तीन महिन्यात महाराष्ट्रात ६५० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोन शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लातूरहून मुंबईला चालत आले. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला आमच्या कृषीमंत्र्यांकडे वेळ नाही. कृषी मंत्र्यांच्या मागच्या काळातील विधाने पाहिली तर सरकारने कृषी क्षेत्राला काय योगदान दिले आहे, हे कळून येईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

कृषी मंत्र्यांना डच्चू मिळणार?

संजय राऊत पुढे म्हणाले, “सरकारमधील कुणाचे व्हिडीओ पैशांच्या बॅगेबरोबर दिसत आहेत. कुणी आमदार निवासात मारहाण करत आहे. कुणी विधानभवनातच मारामाऱ्या करत आहे, अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे. तर कुणी सभागृहात मोबाइलवर गेम खेळत आहे. अमित शाह यांनी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचविले आहे. त्यात कृषी मंत्री कोकाटे यांच्याही नावाचा समावेश आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. त्यात संबंधित कृषी मंत्र्यांचे नाव असल्याचे माझी पक्की माहिती आहे.”

केंद्रातले सरकार दुटप्पी आणि ढोंगी आहे. ऑनलाईन गेमिंग संदर्भात छत्तीसगडमधील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई झाली. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर कारवाई झाली. त्यांच्या चिरंजीवांना ईडीने अटक केली. अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदार करत आहेत. ऑनलाईन गेमिंगच्या व्यवहारात त्यांचाही सहभाग आहे. पण त्यांच्यावर ईडीने कोणतीही कारवाई केली नाही. छत्तीसगड, झारखंड दिल्लीतील लोकांवर जशी कारवाई केली, तशी महाराष्ट्रात होत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माणिकराव कोकाटे यांनी आरोप फेटाळले

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अमित शाह यांनी काय यादी बनवली, याबाबत त्यांनाच अधिक माहिती असावी, असे ते म्हणाले. तसेच मोबाइलवर खालच्या सभागृहात काय कामकाज सुरू आहे, हे पाण्यासाठी युट्यूबवर गेलो असतो सदर जाहिरात सुरू झाली आणि मी लगेच ती स्किपही केली, असे स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिले.