शिवसेना आजवर ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर चालत आली. मात्र, आता हे धोरण बदलावे लागणार असून आता १०० टक्के राजकारण आणि १०० टक्के समाजकारण करायला हवे, असा सूर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी अलिबागमध्ये झालेल्या युवासैनिकांच्या मेळाव्यात आळवला. आता ‘महाराष्ट्रात उद्धवजींचे सरकार आणायचे आहे’, असे वक्तव्य करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या उमेदवारीबाबतही त्यांनी चर्चेला तोंड फोडले.
युवासेनेचे राज्यस्तरीय शिबिर अलिबागमधील चोढी येथील साई इन हॉटेलमध्ये पार पडले. या शिबिरात युवासैनिकांना ‘मार्गदर्शन’ करताना आदित्य यांनी शिवसेनेची आधीची धोरणे बदलण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य वारंवार केले. ‘सामान्य माणसाला असामान्य बनवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. हा वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे’ असे सांगतानाच बाळासाहेबांनी शिवसेनेला आखून दिलेले ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे सूत्र बदलायला हवे, असेही ते म्हणाले. सेनेचे राजकारण यापुढे समाजकारणासाठी असले पाहिजे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.   
‘राजकारण, बॅनरबाजी करू नका आणि आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा’ असे आवाहन कार्यकर्त्यांना करतानाच दिल्लीत मोदींचे आणि महाराष्ट्रात उद्धवजींचे सरकार आणायचे आहे, हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले. मात्र, यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता ‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणायचे आहे’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.  
सैनिक नाही सेवक
शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता यापूर्वी शिवसैनिक म्हणून ओळखला जायचा, आता मात्र ही ओळख बदलायची आहे. शिवसैनिक हा सैनिक म्हणून नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून ओळखला गेला पाहिजे असे मत आदित्य यांनी यावेळी व्यक्त केले. युवा सेनेच्या या शिबीराच्या उद्घाटनीय सोहळ्याला सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, भावना गवळी, राहुल नार्वेकर, मुंबईचे महापौर सुनिल प्रभु, आमदार भरत गोगावले आदी नेते उपस्थीत होते.  
कुलगुरु चालते व्हा
गेल्या दोन वर्षांपासून मुंबई विद्यापिठाच्या कुलगुरूंचा कारभार हा समाधानकारक नाही. ते पात्र आहेत कि अपात्र यात मला शिरायचे नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे. त्यांना विद्यापिठाचा कारभार योग्य प्रकारे चालवता येत नाही. त्यामुळे जर कुलगुरुंना विद्यापिठाचा कारभार चालवता येत नसेल तर त्यांनी चालते व्हावे, सत्ता आली तर सर्व विद्यापिठांचे कुलगुरु बदलणार असल्याचे  यावेळी सांगीतले.
काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
आदीत्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात  काँग्रेस राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राज्यात रोज नवे घोटाळे समोर येत आहेत. त्यामुळे जनता सुखी नाही. राष्ट्रवादी हा भ्रष्टवादी पक्ष असल्याचे ते म्हणाले तर काँग्रेसला पाच वर्षांत राज्याचे युवा धोरणही तयार करता आले नसल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडून युवासैनिकांची निराशा
समारोपावेळी प्रमुख उद्धव ठाकरे राज्यसरकार आणि केंद्र सरकारवर आसुड ओढतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र उद्धव ठाकरे भाषणानंतर त्यांच्या पदरी निराशा आली.जवळपास चाळीस मिनिटे चाललेल्या भाषणात उद्धव यांनी ऐतिहासिक तसेच स्वातंत्र लढय़ातील घटनांचे दाखले देत युवकांना संघटीत होण्याचा संदेश दिला. नुसती गर्दी जमवून काही होणार नाही तर समाजाला संघटीत करुन विशिष्ट ध्येयाने एकत्र येण्यास प्रवृत्त केले पाहीजे असे मत उद्धव यांनी यावेळी व्यक्त केले. सोशल नेटवर्कीगचा वापर योग्य प्रकारे करणे आता पक्ष कार्यकर्त्यांना शिकावे लागणार आहे असेही उद्धव यांनी सांगीतले. महायुती मनसेला स्थान नाही. आमची महायुती भक्कम असून आमच्या कोणतेही वाद नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले.