राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे यांचा अवमानकारक उल्लेख केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुकारण्यात आलेल्या ‘सांगली बंद’ला शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला. या आवाहनाला सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. तासगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर तिथे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले.
प्रक्षोभक भाषण करून धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोमवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडच्या २० जणांसह शिवप्रतिष्ठानच्या १५ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून हे गुन्हे दाखल करण्यात आले.
सांगली शहर आणि मिरजेमध्येही आव्हाडांविरोधात शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. सांगली शहरामध्ये शिवाजी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी प्रक्षोभक भाषण केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांना देण्यात आले. संभाजी भिडे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीची बदनामी करणाऱयांवर कारवाई करा, असे या निवेदनात म्हटले आहे. ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर शहरातील कापडपेठ आणि इतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मात्र, शहरातील बस वाहतूक आणि शाळांचे कामकाज सुरळीतपणे सुरू होते.
जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी संध्याकाळी सांगलीमध्ये केलेल्या भाषणात २००९ मधील मिरज दंगली संदर्भात संभाजी भिडे यांचे नाव घेतल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या गाडीचीही यावेळी तोडफोड करण्यात आली.