शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून मेटेंना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. विनायक मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी बीडकरांनी अलोट गर्दी केली होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात रविवारी विनायक मेटे यांचे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मेटे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले होते. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत शंका उपस्थित केली जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनीही पतीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. “मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलंय. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता” असं ज्योती मेटे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग धोक्याचा ; साडेचार वर्षात ४०० जणांचा मृत्यू सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायक मेटे यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा महासंघाच्या चळवळीतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित केले होते. पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ विधानपरिषदेचे सदस्य राहणारे ते राज्यातील एकमेव नेते होते.