scorecardresearch

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग धोक्याचा ; साडेचार वर्षात ४०० जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८ पासून आतापर्यंत ३३७ प्राणांतिक अपघातात ४०० जणांचा मृत्यू झाला

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग धोक्याचा ; साडेचार वर्षात ४०० जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालविणे, अचानक मार्गिका बदलणे आदी विविध कारणांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत असून शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघातांमुळे पुन्हा एकदा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. द्रुतगती महामार्गावरील अपघात आणि ते रोखण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न आदी मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८ पासून आतापर्यंत ३३७ प्राणांतिक अपघातात ४०० जणांचा मृत्यू झाला असून २६५ गंभीर जखमी अपघातात ६२६ जण जखमी झाले आहेत.

वाहनांसाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील घाट परिसरात प्रतितास ५० किलोमीटर, तर अन्य ठिकाणी प्रतितास १०० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये आणखी पाच टक्के सवलत देण्यात आली आहे. असे असले तरी या महामार्गावर निश्चित केलेल्या वेगमर्यादेचे पालन वाहनचालकांकडून करण्यात येत नाही. परिणामी, भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतात. वेग मर्यादेचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध महामार्ग पोलीस इंटरसेप्टर वाहनांवरील सीसी टीव्ही कॅमेरा, तसेच स्पिडगनच्या माध्यमातून कारवाई करतात. मात्र या कारवाईलाही वाहनचालक जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय निरनिराळ्या प्रकारच्या वाहनांसाठी आखून दिलेल्या मार्गिकांचा वापर न करता वाहन बेदरकारपणे चालविण्यात येते. एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत प्रवेश करून नियमांचे कर्रास उल्लंघन करण्यात येत. असे प्रकार अवजड वाहनांचे चालक मोठ्या प्रमाणावर करीत असतात.

बेदरकारपणे वाहन चालविणे, मार्गिकेचे उल्लंघन करने, दारू पिऊन वाहन चालविणे अशा विविध कारणांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठया प्रमाणात अपघात होत आहेत. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८ पासून जून २०२२ पर्यंत ३३७ प्राणांतिक अपघातात ४०० जणांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये १०० प्राणांतिक अपघातात ११४ जणांचा, तर २०२१ मध्ये ७१ प्राणांतिक अपघातात ८८ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मधील जानेवारी ते जून या कालावधीत ४१ प्राणांतिक अपघातांत ५० जणांना प्राण गमवावे लागले होते. आता जानेवारी ते जून २०२२ या काळात ३० प्राणांतिक अपघात झाले असून त्यात ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांतील सूत्रांनी दिली.

प्राणांतिक अपघात
वर्ष ——– अपघात —— मृत्यू
२०१८——– १०० —— ११४
२०१९ ——– ७४ —— ९२
२०२० ——– ६२ —— ६६
२०२१ ——– ७१ —— ८८
२०२२ ——– ३० —— ४०

गंभीर जखमी
वर्ष ——- अपघात —— जखमी
२०१८ ——- ७६ ——– १७४
२०१९ ——- ६७ ——– १६२
२०२० ——- ३८ ——- ७९
२०२१ ——- ५४ ——– १४६
२०२२ ——- ३० ——– ६५

वेगमर्यादेचे उल्लंघन, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे असे प्रकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सर्रास होत आहेत. त्याविरोधात १७ जुलै ते ३ ऑगस्ट या काळात महामार्ग पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम हाती घेतली होती. या दोन्ही गुन्ह्यांत एकूण साडेसहा हजारांहून अधिक प्रकरणे आढळली असून त्यात वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी चार हजार ७७ प्रकरणांचा समावेश होता. बोरघाट, पळस्पेजवळील खालापूर टोल प्लाझा, वडगाव येथे दोन्ही प्रकारची कारवाई करण्यात आली. बोरघाटात वाहन वेगाने चालविणाऱ्यांविरुद्ध सर्वाधिक कारवाई करण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai pune expressway dangerous for travel mumbai print news amy

ताज्या बातम्या