एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. दरम्यानच्या काळात शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी एक चांगली बातमी समोर आली. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी (२३ ऑगस्ट) ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. वाकचौरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्तेही ठाकरे गटात सामील झाले.

ठाकरे गटात पुन्हा प्रवेश केल्यानंतर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०१४ ला मी थोडं भरकटलो होतो, आता ती चूक दुरुस्त करत आहेत. येथून पुढे उद्धव ठाकरे यांच्या यांच्या शब्दाला सतत जागत राहू आणि त्याचप्रमाणे वागत राहू, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- भाजपाशी युती करण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

यावेळी भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, “२००९ ते २०१४ या कालावधीत मी उद्धव ठाकरे यांच्या कृपेनं, बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि तमाम जनतेच्या व शिवसैनिकांच्या कृपेनं मी खासदार झालो होतो. शिवसेनेचा खासदार म्हणून २०१४ ला मी थोडं भरकटलो होतो. आता ती चूक खऱ्या अर्थाने आता दुरुस्त करत आहे. पुन्हा शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी, शिवसेनेची ताकद राज्यात आणि देशात वाढवण्यासाठी मी पूर्णपणे क्रियाशील राहणार आहे.”

हेही वाचा- उद्धव ठाकरेंचं राजकीय बळ वाढणार; शिवसेनेचे माजी खासदार ठाकरे गटात परतणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाऊसाहेब वाकचौरे हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर शिर्डीतून खासदार झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढले. परंतु त्यावेळी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी वाकचौरे यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर वाकचौरे यांनी भाजपात प्रवेश केला. आता त्यांची घरवापसी झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेला भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे गटाच्या तिकीटावर पुन्हा एकदा शिर्डीतून निवडणूक लढतील असं बोललं जात आहे.