मुख्यमंत्रीपदाचं समसमान वाटप व्हावं हीच शिवसेनेची भूमिका आहे. भाजपाने दिलेला शब्द पाळला पाहिजे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. युतीधर्माचं पालन भाजपाने करावं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही रोखठोक भूमिका मांडली. शिवसेनेने इतर पर्यायांचा विचार केला तर ती विनाशकाले विपरीत बुद्धि ठरेल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे यावर काय म्हणणं आहे असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की विनाशकाले विपरीत बुद्धी ही आमची नाही भाजपाची अवस्था आहे. दिलेला शब्द पाळायाचा ही आम्हाला बाळासाहेबांकडून मिळालेली शिकवण आहे असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- भाजपाकडून ‘गरज सरो वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरु : शिवसेना

एवढंच नाही तर आम्ही नरमाईची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. युती असल्याने चर्चा होऊ शकते असं शिवसेनेने म्हटलं आहे त्यामुळे यात नरमाईचं काहीही धोरण नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. अमित शाह यांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद पार पडली होती त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समसमान फॉर्म्युला असेल हे म्हटलं होतं. आमचीही तेवढी एकच मागणी आहे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंं.  शिवसेना आमच्यासोबत येणार नसेल तर आम्हाला पर्याय खुले आहेत असं जर भाजपा म्हणू शकते तर तो हक्क आम्हालाही आहे. मात्र उद्धव ठाकरे हे पाप करणार नाहीत तसं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे असंही संजय राऊत म्हणाले.

आणखी वाचा- “आधी तुम्हाला मंत्रीपद मिळतयं का बघा”; सेनेवर टीका करणाऱ्या मुनगंटीवारांना राऊतांचा टोला

भाजपाला विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला मिळालेल्या यशात शिवसेनेचाही वाटा आहे. तर शिवसेनेला मिळालेल्या यशात भाजपाचाही वाटा आहे. त्यामुळे आत्ता मिळालेलं यश हे भाजपाने एकट्याचं समजू नये. जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. सगळं काही समसमान या तत्त्वानुसारच पुढची चर्चा होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेना एक पाऊल मागे गेली आहे का? असं वाटत असतानाच संजय राऊत यांनी असं काहीही घडलेलं नसल्याचं आणि शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचं म्हटलं आहे.