औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले होते. पण, हा पराभव खैरे अजूनही विसरू शकलेले नाही. त्याचा प्रत्यय एका कार्यक्रमात आला. चंद्रकांत खैरे यांचा वारंवार माजी खासदार असा उल्लेख करण्यात आल्यानंतर खैरे जाम भडकले. “काय माजी खासदार-माजी खासदाय लावलंय. मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात”, या शब्दात खैरे यांनी संताप व्यक्त केला.
औरंगाबादमध्ये क्रेडाईच्या (Confederation of Real Estate Developers Association of India) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह राजकीय पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम चंद्रकांत खैरे यांच्या भाषणामुळेच जास्त चर्चेत आला. अनेकांनी खैरे यांच्याबद्दल बोलताना त्यांचा माजी खासदार असा उल्लेख केला. त्यामुळे खैर भडकले.
“मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जात आहे. मी खासदार होतो हे सत्य असले, तरी मी आजही शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळेच लोक रोज त्यांची कामे घेऊन माझ्या कार्यालयात येतात”, असे सांगत खैरे यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. याच व्यासपीठावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही खैरे यांना चिमटा काढायची संधी सोडली नाही. “मी खासदार झालो आहे याच्यावर अजूनही काही लोकांचा विश्वासच बसत नाही”, असा टोला जलील यांनी यावेळी लगावला.