कुठेही चिखल करा आणि कमळ फुलवा असं होऊ देणार नाही अशी टीका करत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्याच भाषणात भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर तिखट शब्दांमध्ये टीका केली. “सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हे मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरीही आमच्या सरकारमध्ये एकमत आहे एवढं नक्की. यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा असले प्रकार होऊ देणार नाही” असंही त्यांनी म्हटलं आहे.

“नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे अनेक उद्योग बुडाले. मात्र आमचं सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. केजी टू पीजी शिक्षण बदलण्याची गरज आहे. त्यात नोकरीचीही हमी हवी, डिजिटल एज्युकेशन हे गाव पातळीवर न्यावं लागेल” असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आजच हिवाळी अधिवेशना दरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सामनाचे संदर्भ देऊन शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. सामना मी आता वाचायला लागलो आहे. त्यामुळे त्याचाच संदर्भ देऊन या सरकारमध्ये कशी दुही आहे हे मी दाखवून देतो असंही फडणवीस म्हणाले होते. इतकंच नाही तर हे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन देत होतं मात्र सत्तेवर आल्यापासून मदत दिलेली नाही, यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही झालेला नाही अशीही टीका फडणवीस यांनी केली.

दरम्यान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. सत्तेची हाव कशी असते ते मी पाहिलं आणि मित्रांना कसं डावललं जातं ते मी अनुभवलं असं म्हणत तिखट शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली. आता आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.