शनिवारी पहाटे राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. निकाल लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं अपक्ष आमदारांना बोलावून निधी देण्यावरून धमक्या दिल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केला होता. याच मुद्द्यावरून जळगाव मतदार संघाचे भाजपा आमदार संजय कुटे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना संजय कुटे म्हणाले की, “गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शासन चाललं आहे, ते पाहता केवळ अपक्ष आमदारच नव्हे, तर सत्तेतील आमदार देखील नाराज आहेत. प्रत्येकाला आपल्या मतदार संघासाठी काम करायचं असतं. मतदार संघांतील साडेतीन लाख मतदारांची आमदाराकडून अपेक्षा असते. त्यामुळे निधी न देण्याच्या धमकीला अपक्ष आमदार घाबरणारे नाहीत. सत्तारुढ असो किंवा भाजपाचे आमदारही अशा धमकीला घाबरणार नाहीत.”

हेही वाचा- “संजय राऊत काठावर वाचले, नाहीतर…’, छगन भुजबळ यांचं मोठं विधान

“कारण आमदार हे काही कुणाच्या घरचे गडी नाहीत. जसे संजय राऊत मातोश्रीचे घरगडी असतील किंवा विजय वडेट्टीवार हे सोनिया गांधींकडे घरगडी असतील. त्याप्रमाणे अपक्ष आमदार हे काही कुणाकडे घरगडी म्हणून काम करत नाहीत. त्यांचा स्वत:चा स्वाभीमान आहे,” अशा शब्दांत संजय कुटे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

हेही वाचा- विकास निधीवरून अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या धमक्या; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले…

त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, “महाराष्ट्रात कुणाचीही ताकद नाही, की ते निधी थांबवतील किंवा देणार नाहीत. आम्ही महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचं प्रतिनिधीत्व करतो, ही जनता पाकिस्तानातून आलेली नाही. ही राजेशाही थोडीच आहे. लोकशाहीत निधी मिळवणं हा आमचा हक्क आहे आणि हा निधी कसा मिळवायचा हे अपक्ष आमदारांना आणि आम्हाला माहीत आहे,” असंही ते म्हणाले.