…..म्हणून तर आम्ही १०५ आमदार घरी बसवले-संजय राऊत

पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील असाही व्यक्त केला विश्वास

संग्रहित

महाराष्ट्रातील शिवसेना हा देशात अजिंक्य असा पक्ष आहे म्हणूनच आम्ही १०५ आमदार घरी बसवले असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. मुंबईतल्या विक्रोळी भागात एका कार्यक्रमासाठी आलेल्या संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर “काहीही करा मेट्रोची कारशेड कांजूरलाच होणार असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातली शिवसेना देशात अजिंक्य आहे, म्हणूनच १०५ आमदार आम्ही घरी बसवले. यावेळी त्यांचे १०५ आहेत पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे १०५ आमदार असतील” असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना जनमताचा कौल मिळाला होता. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपाचा यावरुन दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली. एकमेकांशी २५ वर्षांहून अधिक काळ युती करणारे हे दोन पक्ष वेगळे झाले. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. या सगळ्या घडामोडींचे आणि राजकीय नाट्याचे दोन महत्त्वाचे शिल्पकार होते एक होते संजय राऊत आणि दुसरे होते शरद पवार. संजय राऊत हे सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे सांगत होते. त्यांनी त्यांचा शब्दही खरा करुन दाखवला. भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तीन पक्षांच्या युतीमुळे भाजपाला विरोधात बसावं लागलं.

आता पुन्हा एकदा मेट्रोची कारशेड आणि १०५ आमदारांच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. “शिवसेना महाराष्ट्रात असली तरीही बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेली ही शिवसेना आहे. त्यामुळेच शिवसेना देशात अजिंक्य आहे. त्यामुळेच आम्ही १०५ आमदार घरी बसवले. आत्ता त्यांचे १०५ आहेत पण पुढच्या वेळेला आमचे १०५ असतील” असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. एवढंच नाही तर कारशेड कांजूरलाच होणार असाही निर्धार बोलून दाखवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shivsena mp sanjay raut slams bjp and its 105 mla in mumbai speech scj

ताज्या बातम्या