गेल्या अनेक दिवसांपासून अलिप्त असलेले शिवसेनेचे पदाधिकारी शनिवारपासून सक्रिय झाल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागांत वातावरण निर्मिती करण्यात महायुतीला यश आले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाटय़ाला आहे. भाजपाने सर्व इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून आलेल्या डी. बी. पाटील यांना उमेदवारी दिली. डी.बीं.च्या उमेदवारीने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये जशी अस्वस्थता होती. तशीच शिवसेनेमध्येही होती. उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी प्रचारापासून कोसोदूर होते. भाजपने नियोजन केले नाही, समन्वयाचा अभाव, मानपानाचा विषय समोर करीत शिवसेनेने प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बठक वजिराबाद परिसरात पार पडली. या बठकीत काही पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत असलेले सर्व मतभेद दूर ठेवून निष्ठेने प्रचार करण्याचा विचार मांडला. त्याला अनेकांनी प्रतिसाद दिला. भाजपाने विचारो की न विचारो सर्व शिवसनिकांनी निष्ठेने कामाला लागावे, असा निर्धार झाल्यानंतर शनिवारपासून सर्व पदाधिकारी झटून कामाला लागले आहेत. काँग्रेसमधून शिवसेनेत स्वगृही परतलेले माजी महापौर सुधाकर पांढरे, जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे, हेमंत पाटील, भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रवीण जेठेवाड यांच्या पुढाकाराने शिवसनिक सक्रिय झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘चैतन्य’ निर्माण झाले आहे.
शिवसनिकांनी शनिवारी जुन्या नांदेड शहरात पदयात्रा काढून गाठीभेटी घेतल्यानंतर रविवारी तरोडा नाका, अष्टविनायकनगर, राजेश नगर, परवाना नगर, गणेश नगर, अयोध्यानगरी, सरपंचनगर आदी भागात पदयात्रा काढल्या. माजी नगरसेवक उमेश मुंडे यांच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अलिप्त असलेली शिवसेना सक्रिय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. नांदेडमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेनंतर भाजपसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण मतदानापर्यंत कायम ठेवण्याची जबाबदारी युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena office bearer active nanded
First published on: 07-04-2014 at 01:55 IST