सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी जाहीर सभेतून शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. शहाजीबापू यांनी “मी सांगोल्याचा माजलेला रेडा असून खाली शिंगाट घातलं तर तुला असाच उभा करेन, आमच्या नादाला लागू नको” अशा शब्दांत धमकीवजा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख ‘शिवसेनेचा नारद मुनी’ असा केला आहे.

बंडखोरी केल्यानंतर अखेर १५ दिवसांनी शहाजीबापू पाटील हे आपल्या मतदारसंघात परतले. सांगोल्यात गेल्यानंतर त्यांनी जाहीर सभेतून संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “संजय राऊत… मी सांगोल्याचा माजलेला रेडा आहे, एक शिंगाट खाली घातलं तर तुला असाच उभा करेन, आमच्या नादाला लागू नको.” यावेळी त्यांनी भरसभेत संजय राऊतांची नक्कल देखील केली आहे.

त्यांनी नक्कल करताना म्हटलं की, “संजय राऊतांचं मनगट हे अंगठ्याएवढं आहे, आणि ते कापून काढू, प्रेतं आणू अशा धमक्या देतात. तुझं तुलाच चालता येईना, सकाळी बशीभर पोहे खातो, सायंकाळी चपाती खाऊन झोपते. ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची असते, शिकवतो. त्यानंतर अंगात रग येते. मनगटात ताकद येते. ज्यांच्या मनगटात ताकद असते, त्यांनीच बोलावं. उद्धव ठाकरेंमुळे संधी मिळाली आहे, म्हणून संजय राऊतांनी याचा गैरफायदा घेऊ नये. त्यांनी तातडीनं बोलणं बंद करावं, तरच उरलं-सुरलं ठाकरे घराणं राहीन, नाहीतर ठाकरे घराण्याला संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी उचलली आहे,” असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी, शहाजी बापू पाटलांनी सांगोल्यात दाखल झाल्यानंतर, माध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा ते म्हणाले, की राऊतांच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे. सांगोल्यातील मैदानातून त्यांच्याबाबत बोलणार, त्याप्रमाणे शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यातील जाहीर सभेतून संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.