राज्यात सत्तांतर घडवून आणणाऱ्या बंडाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्के बसू लागले आहेत. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६, तर नवी मुंबई पालिकेतील ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता आमदारानंतर नगरसेवकही शिंदे गटात सामील होत आहे. याबाबत बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ही चुकीची माहिती आहे असे म्हटले आहे.

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आम्ही जी झेप घेऊ त्यातून महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल. लोक शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले आहेत, असे म्हटले आहे.

“ही चुकीची माहिती आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई इथे आता कोणीही नगरसेवक नाही. इथे प्रशासक आहेत. नगरसेवक गेले असे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांना परत निवडून यावे लागेल त्यानंतर ते नगरसेवक होतील. या तिन्ही भागांमध्ये शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे चुकीची माहिती देऊन अफवा पसरवू नका. सरकार बदलले असले तरी अजून अफवेला राजमान्यता मिळालेली नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

“जब खोने के लिए कुछ भी न बचा हो, तो…”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट!

“आता आमच्यासाठी आकाश खुले आहे. आता आम्ही जी झेप घेऊ त्यातून महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल. लोक शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहिले आहेत. मातोश्रीने भरभरून दिले त्याबाबतीत जो प्रकार झाला आहे तो महाराष्ट्रातील जनतेला आवडलेले नाही. हे दिल्लीचे कारस्थान आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

ठाण्यात शिवसेनेला खिंडार

दरम्यान, शिवसेनेच्या ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६४ नगरसेवकांनी बुधवारी रात्री मुंबईतील नंदनवन बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यात खासदार राजन विचारे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका नंदिनी विचारे अनुपस्थितीत होत्या. उर्वरित दोनपैकी एक नगरसेवक वैद्यकीय कारणामुळे, तर दुसरा नगरसेवक अमरनाथ यात्रेला गेल्यामुळे उपस्थित नव्हता. ६७ पैकी ६६ माजी नगरसेवकांनी शिंदे यांचे समर्थन केल्याने ठाणे शहरात शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे.

नवी मुंबईतही धक्का

नवी मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या ३८ पैकी २८ माजी नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथील निवासस्थानी भेट घेतली. उर्वरित १० पैकी ५ नगरसेवक संपर्कात असून, तेही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती शिंदे गटातील ज्येष्ठ माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली.