अलिबाग: कोकण किनारपट्टीवर गेल्या पंधरा ते वीस दिवसांत उष्णतेची लाट पहायला मिळाली. ज्याचा विपरीत परिणाम कोकणातील ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन मोहीमेवरही झाला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे यंदा अंड्यातून कासवं बाहेर येण्याचे प्रमाण जवळपास तीस टक्क्याने घटले आहे. ज्यामुळे कासवांच्या पिल्लांची संख्या घटली आहे.
भारतीय उपखंडात चार ते पाच प्रकारच्या कासवांचा वावर दिसून येतो. ज्यात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल या सागरी कासवांच्या प्रजातीचा समावेश असतो. यातील कोकण किनारपट्टीवर ग्रीन टर्टल आणि ऑलिव्ह रिडले या दोन कासवांचे अस्तित्व दिसून येते, मात्र गेल्या काही वर्षांपासून या कासवांचे अस्तित्व विवीध कारणांमुळे धोक्यात आले आहे. हीबाब लक्षात घेऊन कोकण किनारपट्टीवर वनविभाग आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कासव संवर्धन मोहीम राबविली जात आहे.
हेही वाचा : राज्यातील अखेरच्या टप्प्यात कुणाची बाजी?
रायगड जिल्हयात श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर किनाऱ्यांवर कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. परंतु यंदा वाढलेल्या उष्णतेमुळे अंडी खराब होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कासवांच्या पिल्लांच्या जन्मदरात मोठी घट झाली असल्याचे निरीक्षण कासव संवर्धन प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांनी नोंदविले आहे.
राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोकण किनारपट्टीवर यंदा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. किनारपट्टीवरील तापमानात सरासरी पेक्षा वाढ झाल्याचे दिसून आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण जास्त होते. तापमानाचा पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. याचा परिणाम कासवांच्या अंड्यांवर दिसून आला.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कासवांचा अंडी घालण्याचा काळ असतो. ४० ते ५० दिवसांनी या अंड्यामधून कासवांची पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात होते. मात्र हवामानातील बदलांमुळे अंडी घालण्याचा कालावधी डिसेंबर ते मार्च पर्यंत लांबला. त्यामुळे मार्च महिन्यात घातलेल्या अंड्यामधून मे महिन्यात कासवांची पिल्ले बाहेर येण्यास सुरूवात झाली. मात्र अंड्यांना उष्णतेची झळ बसल्याने त्यामुळे अंड्यांमधून कासवाची पिल्ले बाहेर ३० टक्क्यांने घटले आहे.
कासव ज्या ठिकाणी घरटी बांधतात. तेथील हवामानाचा अंड्यावर परिणाम होत असतो. घरट्याचे तापमान थंड असेल पुरूष प्रजातीचे कासव जन्माला येतात. तापमान उष्ण असेल तर मादी प्रजातीचे कासव जन्माला येत असतात. पण अती उष्णता झाली, तर अंडी खराब होतात. त्यातून पिल्ले बाहेर येण्याचे प्रमाण घटत जाते. कधी कधी शंभर अंड्यामधून एकही पिल्लू बाहेर येत नाही.
निधी म्हात्रे, कासव अभ्यासक
हेही वाचा : “…तर निवृत्ती घेतली असती”; फडणवीसांचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले, “जर वेळ आली”
गेल्या वर्षी याच कालावधीत अंड्यामधून पिल्ले बाहेर न येण्याचे प्रमाण १० ते १५ टक्के होते. पण यावर्षी उन्हाचा चटका वाढला आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्याची वाळू तापते आहे. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अंडी खराब होण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे.
सिध्देश कोसबे, कासव मित्र दिवेआगर