राज्यात २०१९ मध्ये सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील संबंध कमालीचे ताणले गेल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. मात्र, नुकतीच एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि भाजपासोबत सत्तास्थापन करणं या गोष्टींमुळे शिवसेना आणि भाजपामधील राजकारण अधिकच तापलं आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मग ते विधिमंडळ असो किंवा रस्त्यावर उतरून केलेली आंदोलनं असोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर भाजपाविरोधात अधिक आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी भाजपावर खोचक शब्दांत टोलेबाजी केली.

“यांचा एककलमी कार्यक्रम म्हणजे…”

दुसऱ्या पक्षातून आमदार-खासदार चोरणं हाच यांचा एककलमी कार्यक्रम झालाय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. “यांचा एककलमी कार्यक्रम आहे की दुसऱ्या पक्षातून नेते आणा.. आमदार-खासदार आणा. तेही पुरत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातून पक्षप्रमुख चोरा. स्वत:ला स्वप्नंही पडत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांची स्वप्नंही चोरा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“उद्धवजी, मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? विधिमंडळात या आणि..”, भाजपाचं खुलं आव्हान!

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपा राष्ट्रीय पक्ष नसून चोरबाजार असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. “सगळे आमदार, खासदार, नेते, स्वप्न चोरायचे. मग तुमचा पक्ष आहे की चोरबाजार?” असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तेवढ्यात समोर बसलेल्यांपैकी कुणीतरी ठाण्याचा उल्लेख करताच “ठाण्यामध्ये तर काही बोलूच नका. पण तिथेही कधीकाळी असं होतं. मी लहानपणापासून ऐकलंय. मला कुतुहल होतं. मला खरंच एकदा जायचं होतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चोरलेली वस्तू चोरबाजारात मिळते”

“चोरलेली वस्तू चोरबाजारात मिळते का बघा. तसं आता कुणी माणसं आमदार-खासदार गायब झाले, तर त्यांनाही तिथेच बघावं लागेल”, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला. “स्वत:चा विचार नाही, आचार नाही. फक्त सत्ता पाहिजे. काही वाट्टेल ते करू, पण सत्ता पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.