काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारमधील काही मंत्री-पदाधिकारी अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी टीकाही केली होती. राज्यात अवकाळीमुळे शेतकरी हवालदील असताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर का गेले? असा प्रश्नही विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शनही केल्याचं बोललं गेलं. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी लोकसत्ताच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ‘तुम्ही अयोध्येला कधी जाणार?’ असा प्रश्न विचारला असता त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टोलेबाजी केली. “मी अयोध्येला जाऊन आलो आहे. पण आता तिथे मंदिर तर तयार होऊ द्या. नाहीतर पु. ल. देशपांडेंच्या त्या किश्श्यासारखं होईल. घर पाहावे बांधून वगैरे. आता मंदिर तयार झाल्यावर जाईन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देशात आणि राज्यात विरोधकांची एकजूट कायम राहील!; उद्धव ठाकरे यांना ठाम विश्वास, भाजपबरोबर जाण्याची शक्यता फेटाळली

“तुम्हाला माहितीसाठी सांगतो. जेव्हा हा प्रश्न थंड बासनात होता, तेव्हा तो शिवसेनेनं उचलला होता. त्यावेळी मी अयोध्येला गेलो होतो. जाताना माझ्या मनात आलं की शिवनेरीवरची एक मूठ माती बरोबर घेऊन जावं. मग मी शिवनेरीला जाऊन एका कलशात शिवजन्मभूमीची माती घेतली आणि रामजन्मभूमीला गेलो. तिथल्या पुजाऱ्यांच्या हातात ती माती दिली. तुम्ही माना अथवा नका मानू. पण वर्षभराच्या आत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. माझ्या ध्यानीमनी नसताना त्या वर्षाच्या आत मी मुख्यमंत्री झालो”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

एकनाथ शिंदे गटाला टोला!

“मुख्यमंत्री झाल्यानंतरही मी गेलो. त्यामुळे मी कुठेही सूरत, गुवाहाटीला गेलोच नाही. मुख्यमंत्रीपदावरून उतरूनही आता आठ महिने झाले. तरी गुवाहाटी किंवा सूरतला गेलो नाही. आधी अयोध्येला गेलो”, असं म्हणत त्यांनी शिंदे गटालाही टोला लगावला.

“देवेंद्र फडणवीस पाच वर्षं आमच्याबरोबर असताना…”

“काही जण शाळेतल्या सहलीसाठी बाबरीच्या वेळेला तिकडे गेले होते असं म्हणतात. कारण तेव्हा त्यांचं वय तसं होतं. पण नंतर ते मुख्यमंत्री झाल्यावर तिकडे गेल्याचं माझ्या तरी वाचनात आलं नाही. ते आत्ता का अचानक गेले मला माहिती नाही. पाच वर्षं आमच्याबरोबर ते मुख्यमंत्री होते. पण तेव्हा मुख्यमंत्री असतानाही ते अयोध्येला गेले नाहीत. क्रेडिट जाऊ नये म्हणून गेले की काय मला माहिती नाही”, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दांत लक्ष्य केलं.

Live Updates