Uddhav Thackeray Mulakhat Part-2: माझ्या एकाही माणसाने सभागृहात माझ्याविरोधात मत व्यक्त केलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद ठरलं असतं, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यामुळेच आपण विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न गेल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी येऊन नीट सांगितलं असतं तर मी सन्मानाने केलं असतं असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंसहित पक्षातील आमदार आणि खासदारांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली असून यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांसोबतच, राज्यातील सत्तांतर यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

बंडखोरांकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपाच्या आरोपांवर उद्धव ठाकरे १२ हजार कोटींचा उल्लेख करत म्हणाले, “त्या दिवशी अजित पवारांनी…”

विश्वासादर्शक ठरावाला सामोरे गेला असतात तर फुटीर गट अजून उघडा पडला असता असं संजय राऊत म्हणाले असता उद्धव ठाकरेंनी सांगितलं “तो पडलाच ना, अध्यक्षांच्या निवडणुकीत पडला, त्यानंतरही पडला आणि पडतच चालला आहे. निवडणूक आयोगाला जे पत्र दिलं आहे त्यातही शिस्तभंगाच्या कारवाईचा उल्लेख आहे. मी नेहमी म्हणतो की, हल्ली लोकशाहीमध्ये डोकं वापरण्यापेक्षा ते मोजण्यासाठीच जास्त उपयोग होत आहे”.

“नितीन गडकरी म्हणाले होते आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

“मला सातत्याने काँग्रेस धोका देणार असं भासवलं जात होतं. शरद पवारांची तशी ओळखच आहे असं ते म्हणत होते. पण माझ्या लोकांनीच मला दगा दिला,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

“विश्वासघातक्यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का विचारलं होतं”

“माझ्या एकाही माणसाने सभागृहात माझ्याविरोधात मत व्यक्त केलं असतं, तर ते माझ्यासाठी लज्जास्पद होतं. शेवटच्या काळातही मी विश्वासघातक्यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? विचारलं होतं. काँग्रेस, राष्ट्रवादीशी मी बोलतो, भाजपासोबत जायचं आहे तर मला भाजपाकडून दोन तीन प्रश्नांची उत्तरं मिळू द्या. आपण काँग्रेस, राष्ट्रवादीला जाऊन सांगू की, माझे लोक तुमच्यासोबत आनंदाने राहण्यास तयार नाहीत. पण त्यांच्याकडे तेवढी हिंमतच नाही. यांच्याकडे काही कारणच नसून रोज वेगळं कारण येत आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचीही माझी तयारी नव्हती”

मुख्यमंत्रीपद सोडण्यास तुम्ही तयार होता का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले “मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचीही माझी तयारी नव्हती. पण त्या काळात जिद्दीने मी केलं. मी इच्छेने नाही तर जिद्दीने मुख्यमंत्री झालो. माझ्या परीने मी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला”.

“सध्याचं ‘हम तुम एक कमरे मे बंद हो’ असंच सरकार आहे. वरुन चावीने उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“घटनाबाह्य कृत्य कऱण्याची हिंमत देशात कोणाची असेल असं वाटत नाही”

“अपात्रतेचं प्रकरण कोर्टात असल्याने मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. अनेक घटनातज्ज्ञांच्या मताप्रमाणे काय होणार हे जनतेला कळलं आहे. कायद्यात स्पष्ट सांगितलं आहे. घटनाबाह्य कृत्य कऱण्याची हिंमत देशात कोणाची असेल असं वाटत नाही. त्यामुळे न्यायालयात जे काही होईल ते होणारच आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.