अकोला महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बुधवारी भाजप-शिवसेनेने बाजी मारली असून महापालिकेवर भगवा फडकला आहे.भाजपच्या उज्ज्वला देशमुख महापौर तर शिवसेनेचे विनोद मापारी उपमहापौरपदी सहजपणे निवडून आले आहेत.

भारिप-बमसं व काँग्रेसमधील बेबनाव याला मुख्यत: कारणीभूत ठरला आहे. शिवाय सुरुवातीपासून खासदार संजय धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा यांनी जी योजना केली ती शेवटी यशस्वी ठरली आहे.
अकोला महापालिकेत भाजप-सेना व काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या युती व आघाडीला स्पष्ट बहुमत नाही त्यामुळे अपक्ष आणि भारिप-बमसं यांना यावेळी फारच महत्त्व आले होते. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस व भारिपने युती करून सत्ता स्थापन केली होती पण गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत या दोन्ही पक्षातून विस्तव जाणे कठीण झाले होते. त्याचा परिणाम या आजच्या निवडणुकीत दिसून आला. भाजपकडून उज्ज्वला देशमुख या एकमेव उमेदवार निवडणूक रिंगणात महापौरपदासाठी होत्या. काँग्रेसकडून पाच महिलांची नावे देण्यात आली होती. तेव्हाच काँग्रेसमध्ये या पदासाठी गांभीर्य नाही असे दिसून येत होते. आज उज्ज्वला देशमुख यांना भाजप-सेना व इतर अपक्ष मिळून ३७ मते मिळाली तर विरोधातील हाजराबी यांना केवळ ८ मते मिळाली.
दुसरीकडे उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे विनोद मापारी यांना ३८ तर विरोधातील नकीर यांना केवळ ८ मते पडली. काँग्रेस व भारिप-बमसंमध्ये मतभेद कायम राहिल्याने काँग्रेसने शेवटपर्यंत आपल्या पक्षाकडून कोण महापौर पदासाठी राहील हे घोषित केले नाही. शिवाय ऐनवेळी सभागृहातून सभात्याग केला. त्यामुळे काँग्रेसचे सदनात १८ सदस्य असतानाही हाजराबी यांना केवळ ८ मते मिळाली. काँग्रेसने सभात्याग केल्यामुळे भारिप बमसंनेही मतदानापासून अंतर राखले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व अकोला महानगर पालिकेवर भगवा फडकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसला मुस्लीम महापौर नको होता -गजानन गवई
भारिप-बमसंने काँग्रेसला मुस्लीम महिला महापौर बनवा व भारिपचा उपमहापौर बनवा अशी विनंती केली होती. मुस्लीम महिलेस महापौर बनविण्यास काँग्रेसचा विरोध होता व म्हणून त्यांनी आमची विनंती धुडकावली परिणामी आम्ही त्यांना पाठिंबा दिला नाही. लोकसभेच्या वेळी काँग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांना संपविण्यासाठी ऐनवेळी स्वत:चा उमेदवार देवून भारिपशी विश्वासघात केला म्हणून आम्ही काँग्रेसला या निवडणुकीत धडा शिकविला असे मनपातील भारिप बमसंचे गट नेते गजानन गवई म्हणाले.

भारिप-बमसंने धोका दिला -मदन भरगड
यावेळी काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादी कांँग्रेसचा उपमहापौर व स्थायी समितीचे अध्यक्षपद भारिपला देण्याचे आधी ठरले होते पण ऐनवेळी भारिप बमसंने धोका दिला व उपमहापौर पदाची मागणी केली त्यामुळे सर्वाची युती झाली नाही. आमचे संख्याबळ नव्हते म्हणून काँग्रेस सदस्यांनी सदनातून सभात्याग केला, असे मनपातील काँग्रेसचे गटनेते मदन भरगड म्हणाले.