राहाता: श्री साईबाबा संस्थान, नाट्य रसिक मंच व शिर्डी ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याला आज शुक्रवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. पारायण सोहळ्यात सुमारे ५ हजारांवर महिला व २ हजारांवर पुरुष असे सुमारे ७ हजारांवर पारायणार्थी सहभागी आहे. सोहळ्याची सांगता १ ऑगस्टला होईल.
सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या श्री साईसच्चरित ग्रंथाची व प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी वीणा तर प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा, वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला. मंदिर प्रमुख विष्णु थोरात उपस्थित होते.
पारायण मंडपात गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ग्रंथ व कलश पूजन करून पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी पुरुष व दुपारी महिला वाचक श्री साईसच्चरिताचे पारायण करत आहेत. रात्री श्रीसाईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विद्या मंदिरने सांस्कृतिक कार्यक्रम व लहू महाराज कराळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला.