आंबोली येथील वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार शुभम कमलाकर आळवे यांनी भारतातीलच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे सॅनक्च्युरी एशिया या निसर्गावर आधारित मासिकाच्या छायाचित्र स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे रोख रुपये ७५००० हजारांचे पारितोषिक पटकावले. सोबत त्यांना मानाचे असे प्रशस्तिपत्रकही प्रदान करण्यात आले.
त्यांच्या या कामगिरीमुळे आंबोलीत नाही तर संपूर्ण सिंधुदुर्गची मान उंचावली आहे. मागील पाच वर्षांपासून शुभम आळवे हे आंबोली व आसपासच्या परिसरात वन्यजीव तसेच वनस्पती यांचे छायाचित्रण करीत आहेत. त्यांनी या छंदाची सुरुवात इयत्ता आठवीत असल्यापासून पक्षिनिरीक्षणाच्या माध्यमातून केली व बारावीनंतर ते हळूहळू छायाचित्राकडे वळले. यात त्यांना वन्य प्राणी छायाचित्रकार हेमंत ओगले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जैवविविधतेतील कोणत्याही घटकाचे ते इतक्या लीलया छायाचित्रण करतात की, बघणारा थक्क होतो. त्यांच्या याच गुणांमुळे त्यांच्याकडून या छायाचित्रणाचे धडे घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निसर्ग छायाचित्रकार आंबोलीत येऊ लागले आहेत. वन्यजीव गाईड म्हणूनही ते आंबोलीतील प्रसिद्ध आहेत. मल्हार निसर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातूनही ते आपले काम करीत असतात. भारत तसेच आशियातील स्पर्धामधील छायाचित्रण स्पर्धेतील हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार असून, वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी हा सन्मान शुभम यांनी मिळवला आहे.