मद्यप्राशन केलेल्या चालकाच्या हाती गाडी देऊन अपघात घडविण्यास कारणीभूत ठरल्यावरून कोल्हापूरातील सहा पोलीस कर्मचाऱयांना बुधवारी निलंबित करण्यात आले. याप्रकरणी अपघातग्रस्त गाडीच्या चालकाला याआधीच निलंबित करण्यात आले आहे.
रविवारी रात्री पहारा देण्यासाठी म्हणून हे पोलीस वाहनातून बाहेर पडले होते. परंतु यातील चालकासह अन्य काही पोलीस हे मद्यधुंद अवस्थेत होते. या अशा अवस्थेत चालकाने हे वाहन बेफाम वेगाने चालवले. यामुळे रस्त्यात घबराट उडाली होती. अखेरीस हे वाहन शहरातील वाशी नाक्याजवळील राज कपूर पुतळा चौकातील विद्युत खांबाला धडकले आणि रस्त्यावरील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
दरम्यान, या अपघातामुळे विजेचा खांब तुटल्याने तसेच शॉर्टसर्किटमुळे मोठा आवाज झाला. तसेच आगही लागली. यामुळे परिसरात सर्वत्र धावपळ उडाली. रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते.