राज्यातील प्रमुख पर्यटन शहर असणाऱ्या मुरुड शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी शेकापनेच पाठपुरावा केला. गेल्या १० वर्षांत नगरपालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी-कॉँग्रेसने काय केले, असा सवाल आमदार मीनाक्षी पाटील यांनी केला आहे. त्या काशिद इथे पत्रकारांशी बोलत होत्या.
राज्याच्या पर्यटन विकास योजनेतून मुरुड शहरासाठी तब्बल ११ कोटी ५६ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. राज्यात आराखडा न तयार करताही विशेष बाब म्हणून मंजूर होणारी ही एकमेव योजना असल्याचेही मीनाक्षी पाटील यांनी स्पष्ट केले. मुरुड शहराला दर वर्षी जवळपास २ लाख पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे शहराची फ्लोटिंग पॉप्युलेशन मोठी आहे. शहराला आजही शंभर वर्षे जुन्या नवाबकालीन पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यामुळे शहराला उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असते. ही बाब लक्षात घेऊन शहरासाठी खारअंबोली धरणातून पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी शेकापने सातत्याने पाठपुरावा केला होता. विधिमंडळ अधिवेशनात यावर वेळोवेळी चर्चादेखील घडवून आणल्या. त्यामुळे शासनाने ही योजना मंजूर केली असल्याचे मीनाक्षी पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र दोन वर्षांत नगरपालिकेवर सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीला ही योजना पूर्ण करता आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. २३ सप्टेंबर २०१० ला या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. तेव्हा या योजनेची मूळ किंमत ९ कोटी ८४ लाख होती. १८ महिन्यांत ही योजना पूर्ण होणार होती. आजवर या योजनेवर १० कोटी ८४ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. मात्र तरीही शहराला पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.