रायगड जिल्हा वार्षकि योजनेअंतर्गत माथेरान येथे आकाशदर्शन प्रकल्प साकारण्यात आला आहे. पर्यटक आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी उभारण्यात आलेला हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे. त्यामुळे हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्धीस आलेला माथेरान आता खगोल अभ्यासाचे केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे.
देशविदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या माथेरानमध्ये आकाशदर्शन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प म्हणजे पर्यटक आणि खगोलप्रेमींसाठी मोठी संधी ठरणार आहे. रायगड जिल्हा वार्षकि योजना आराखडय़ात नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी ७० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. दा. कृ. सोमण यांचे महत्त्वाचे योगदान लाभले आहे.
माथेरानमधील मुख्य बाजारपेठेपासून साधारण १०० ते १५० मीटर अंतरावर असलेल्या पेमास्टर पार्कजवळील जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या इमारतीच्या गच्चीवर या आकाशदर्शनासाठी अत्याधुनिक दुर्बणिी बसवण्यात आल्या आहेत. दिवसा वैज्ञानिक कार्यशाळा तर रात्री आकाश निरीक्षण अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प कार्यान्वयित केला जाणार आहे. खगोल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी छोटय़ा कार्यशाळा सुरू केल्या जाणार आहेत. माथेरानमध्ये सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी यानिमित्ताने पाहायला मिळते आहे. माथेरानचा निसर्ग आणि माथेरानची रेल्वे हे आजवर पर्यटकांच्या पसंतीला उतरत आले आहेत; पण आता या आकाशदर्शनाची भर पडणार आहे.
कसा आहे आकाशदर्शन प्रकल्प
या प्रकल्पात आकाशदर्शनासाठी आठ अत्याधुनिक दुर्बणिी बसवण्यात आल्या आहेत. यात जर्मन बनावटीची इक्वेटोरिअल स्वयंमचलित संगणकीकृत मोठय़ा दुर्बणिीचा समावेश आहे. तिची लेन्स साधारण १४ इंच इतकी लांब आहे. याशिवाय दोन डॉप्सीनियन टेलिस्कॉप, २ बायनॉक्यूलर, १ रिफ्लेक्टर टेलिस्कॉप, १ स्काय गाइड छोटय़ा दुर्बणिीचा समावेश आहेत.
याशिवाय पर्यटक आणि अभ्यासकांना खगोलीय घडामोडींची माहिती देण्यासाठी ३५ आसनी थ्रीडी थिएटर आणि ग्रहताऱ्यांची माहिती देणारे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
काय पाहायची संधी मिळणार
हा प्रकल्प आकाश निरीक्षकांसाठी मोठी पर्वणीच असेल. ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावरचा चंद्र, १५ हजार किलोमीटरवरचा सूर्य, ९ प्रकाशवष्रे अंतरावरची व्याध तारका, ६८ प्रकाशवष्रे अंतरावरची रोहिणी यांच्यासह अवकाशातील ग्रहतारे,चंद्रावरची विवरे, गुरू ग्रहाचे ४ चंद्र, शनीची वलये, शुक्राची कोर, द्वैती तारका पाहण्याचा आनंद मिळणार आहे. लेझर पॉइंटच्या साहाय्याने प्रत्यक्ष आकाशदर्शन घडणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खगोल अभ्यासाची मेजवानी मिळणार आहे.
माथेरानमधील सर्वात उंचावर असलेल्या पेमास्टर पार्कमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे खगोल अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय पोषक वातावरण इथे उपलब्ध आहे. पर्यटक आणि अभ्यासकांना अत्याधुनिक दुर्बणिी हाताळण्याची संधी येथे उपलब्ध असेल. असे आकाशदर्शन प्रकल्पाचे समन्वयकशैलेश संसारे यांनी सागितले. तत्कालीन जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांच्या संकल्पनेतून माथेरानमध्ये हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या आगळ्या उपक्रमाला खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी विनामोबदला तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून दिले. तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. असे माजी जिल्हा नियोजन अधिकारी राजेश तितर यांनी सांगितले.
सध्या डोळ्यांनी कधी न दिसणारे ग्रहतारे या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे मुलांमध्ये जिज्ञासा आणि कुतूहल जागृत होण्यास मदत होईल. हौशी अभ्यासकांसाठी ही पर्वणीच ठरेल. असे पर्यटक अभिजित बर्वे यांनी सागितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2016 रोजी प्रकाशित
माथेरानमध्ये साकारला आकाशदर्शन प्रकल्प
रायगड जिल्हा वार्षकि योजनेअंतर्गत माथेरान येथे आकाशदर्शन प्रकल्प साकारण्यात आला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-05-2016 at 01:26 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sky observation project in matheran