सर्वोच्च न्यायालायने काल (११ मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी निकाल वाचून दाखवला. सर्व निरीक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने नोंदवली असली तरीही शिंदे सरकार कायम राहिलं आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर ती ही परिस्थिती ओढावली नसती असंही सर्वोच्च न्यायालायने नमूद केलं. परंतु, मी कायदेशीर चुकीचा असलो तरीही नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला होता, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं. यावरून शिंदे-फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून ठाकरेंना घेरलं. याला उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

आमच्यासोबत निवडणूक लढवून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करताना नैतिकता कुठे गेली होती, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. तसंच, उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या गोष्टी करूच नयेत, असंही त्यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या या आरोपावर चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा >> Uddhav Thackeray PC: “जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर…”, उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना इशारा; सरकारला पुन्हा दिलं ‘ते’ आव्हान!

“आम्ही पंचवीसवर्षे भाजपासोबत युतीसोबत होते. कोणाच्या शेजारी काय बांधला? वाण नाही पण थोडा काळ गुण लागला असेल तर त्यांना वाटलं असेल. कारण, काल नितिश कुमार आणि तेजस्वी येऊन गेले. त्यांचं सरकार यापूर्वीही होतं. त्यांचं सरकार तोडून भाजपा संसारात घुसली होती. ही त्यांना नैतिकता वाटत असेल तर त्यांचा प्रश्न योग्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी त्यांना राज्यपालांच्या भूमिकेविषयीही विचारलं. त्यावर ते म्हणाले की, “राज्यपालांची भूमिका घृणास्पद आहे. निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रक्रिया असली पाहिजे हे मी पूर्वीही बोललो आहे. सुदैवाने किंवा योगायोगाने त्याच सुमारास त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. निवडणूक आयोग नेमताना सुद्धा कोण त्यात पाहिजे याची नियमावली दिली. राज्यपाल ही संस्था घरगड्याप्रमाणे वापरली जात असेल तर ती संस्था बरखास्त करायला पाहिजे. कारण आम्ही राजकारणी लोक लोकप्रतिनिधी असतो, वरून लादलेला माणूस मनमानी काम करणार असेल तर ती शोभेची नाही तर उपद्व्यापी असतील, असंही ते म्हणाले.