सावंतवाडी : गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा-सटमटवाडी सीमेवरील तपासणी नाक्यावर अवजड वाहने पार्क करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते सीए साईप्रसाद कल्याणकर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या जागेसंदर्भात न्यायालयीन वाद सुरू असून, येथे वाहने उभी केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

कल्याणकर यांनी सांगितले की, बांदा-सटमटवाडी सीमा तपासणी नाका अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. कंत्राटदार कंपनीला दुसऱ्या कंपनीकडून पैसे मिळालेले नाहीत. या प्रकरणी सावंतवाडी न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत कंपनीने ही जागा आपल्या ताब्यात ठेवावी.

वाहतूक पोलिसांच्या निर्णयावर आक्षेप

या न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करून रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहने या नाक्यावर पार्क करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांनी कंत्राटदाराने याला परवानगी दिली असल्याचे खोटे सांगितले असल्याचा आरोप कल्याणकर यांनी केला आहे. संबंधित कंपनीला संपर्क साधला असता, ३१ जुलै किंवा त्या आसपास त्यांना कोणाचाही फोन आला नसल्याचे स्पष्ट झाले, असे कल्याणकर यांनी सांगितले.

मागील वर्षाचा वाईट अनुभव आणि आरोग्याची समस्या

कल्याणकर यांनी गेल्या वर्षीच्या अनुभवाचा संदर्भ देत सांगितले की, वाहने पार्क करून राहणाऱ्या चालकांसाठी शौचालये, पाण्याची सोय किंवा जेवण यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे देवस्थान असलेल्या या परिसराचे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीमुळे प्रदूषण होते. या गंभीर आरोग्यविषयक समस्येमुळेही या ठिकाणी गाड्या पार्क करण्यास त्यांचा विरोध आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण आणि पुढील कार्यवाहीची मागणी

ते पुढे म्हणाले की, NH-६६ महामार्गाचे आता चौपदरीकरण झाले आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या चेकपोस्टमध्ये वाहने पार्क करण्याची गरज नाही. जर वाहतूक पोलिसांनी हा निर्णय मागे घेतला नाही, तर न्यायालयाचा अवमान होणार असल्याने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सर्वप्रथम न्यायालयाची परवानगी घेऊनच वाहने पार्क करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी कल्याणकर यांनी केली आहे.

गणेशोत्सवात अवजड वाहनांना बंदी महाराष्ट्र राज्यात गणेश चतुर्थी सणाच्या काळात ११ दिवस अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहने या बंदी काळात आली तर महाराष्ट्र-गोवा सीमेवर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. कल्याणकर यांनी दिला आहे.