गुंजन गोळे यांच्या उपक्रमाला प्रतिसाद
मोहन अटाळकर, लोकसत्ता
अमरावती : एचआयव्हीबाधित महिलांच्या बाळांसह अनेक बेवारस नवजात अर्भकांना दुधाची गरज भासते. अनेकदा मातेची प्रकृती चांगली नसल्याने ती बाळाला दूध देऊ शकत नाही. तसेच काही स्तनदा मातांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या बालकांना दूध कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण होतो.
गरजू बालकांना मातेचे दूध मिळवून देण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्यां गुंजन गोळे यांनी पुढाकार घेतला आहे. संकोचामुळे किं वा अंधश्रद्धेतून अनेक स्तनदा माता दुग्धपेढीसाठी दूध उपलब्ध करून देण्यास तयार होत नाहीत. त्यासाठी जनजागृती करण्याचे काम गोळे यांच्या संस्थेने हाती घेतले आहे. बाळांना दुग्धपेढीची संजीवनी देण्याच्या त्यांच्या उपक्र माला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
आजही अनेक वेळा आईचे दूध मिळत नसलेल्या नवजात बालकांना डबाबंद पावडरचे दूध दिले जाते, पण याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या अनेक जण मातृदुग्ध पेढीच्या माध्यमातूनच बालकांना दूध देण्याचा प्रयत्न करत आहेत.
दुग्धसंकलन वाढविण्यासाठी मातांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दिवसागणिक गरजू बालकांची संख्याही वाढत आहे. प्रसूतीनंतर घरी गेलेल्या काही माता दूधदान करण्यासाठी येत असतात. पण त्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अनेक बालकांना आईच्या दुधाची गरज आहे. मातृदुग्ध संकलन करण्यासाठी आता गुंजन गोळे यांनी पुढाकार घेतला आहे.
गुंजन गोळे यांच्या गोकु ळ आश्रम या संस्थेत एचआयव्हीग्रस्त महिलांच्या, बेवारस अवस्थेत टाकू न दिलेल्या नवजात बालकांचा सांभाळ गेला जातो. या बालकांना आईच्या दुधाची गरज असते. गुंजन गोळे यांनी स्वत: दुग्धदानाला सुरुवात के ली. त्यांच्या आश्रमातील आठ बाळांना त्यांनी दूध पुरविले. अनेक वेळा स्तनदा मातेचा अतिरिक्त दूध काढून फे कू न द्यावे लागते. अशा दुधाचे संकलन व्हावे आणि गरजू बालकांना ते उपलब्ध व्हावे, असा विचार गुंजन गोळे यांच्या मनात आला.
काही दिवसांपूर्वी त्यांना एका मैत्रिणीचा फोन आला. त्यांच्या १३ दिवसांच्या जुळया बाळांना आईच्या दुधाची तात्काळ आवश्यकता होती. पावडरचे दूध त्यांना पचत नव्हते आणि अमरावतीच्या दुग्धपेढीमध्ये दूध उपलब्ध नसल्याने बिकट परिस्थिती होती. गुंजन गोळे यांनी लगेच दुधाची व्यवस्था के ली. पण, हा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मातृदुग्धपेढीतले दूध अशा बालकांसाठी जीवनामृत ठरते. मातांनी दान केलेले दूध या पेढीमध्ये साठवून आवश्यकतेनुसार बालकांना दिले जाते. आई आजारी असेल, बाळाचा जन्म मुदतीपूर्वी झाला असेल, त्याचे वजन कमी असेल, प्रसूतीनंतर काही आणीबाणी उद्भवली आणि त्यामुळे आईला बाळाला स्तनपान करता येत नसेल, जुळ्या किंवा त्यापेक्षा जास्त बाळांना जन्म दिला असेल किंवा संपूर्ण बधिर करून सिझेरियन शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा परिस्थितीत बाळाची आईच्या दुधाची गरज पूर्ण होत नाही. त्याला दुसऱ्या आईचे दूध संजीवनी ठरते. अन्यथा दुधाअभावी त्याचा मृत्यू ओढवू शकतो. असे मृत्यू टाळण्यासाठीच मातृदुग्धपेढीची संकल्पना जन्माला आली. रक्तपेढीसारखीच मातृदुग्धपेढीची संकल्पना आहे.
स्वत:च्या बाळाची गरज पूर्ण केल्यानंतर आई तिचे अतिरिक्त दूध स्वेच्छेने या पेढीला दान करू शकते. असे दूध घेण्यापूर्वी त्या आईच्या एचआयव्ही, हेपेटायटिस व अन्य आवश्यक चाचण्या केल्या जातात. त्या सामान्य आल्यानंतरच संबंधित महिलेचे दूध स्वीकारले जाते.
ज्याप्रमाणे रक्तदान चळवळ उभी होत आहे त्याचप्रमाणे दूधदान चळवळ पण व्यापक स्वरूपात उभी राहायला हवी. आम्ही दूधदान चळवळ अमरावतीमध्ये सुरू केली आहे. अनेक महिला जुळल्या आहेत. त्या आपले अमूल्य दूध दान करून अनेक बाळांना जीवनदान देतील. स्तनदा मातांनी संकोच न करता समोर यावे आणि आपले दूध दान करून दुग्धपेढीतील तुटवडा कमी करण्यास मदत करावी. अमरावतीत इच्छुक स्तनदा मातेच्या घरी जाऊन दूध संकलित करून बाळापर्यंत नेण्याची व्यवस्था आमचे सहकारी करीत आहेत.
– गुंजन गोळे, सामाजिक कार्यकर्त्यां, अमरावती</strong>