पुणे जिल्ह्यातील पाणी उजनी धरणात आणण्यासाठी आपण सातत्याने आग्रही पाठपुरावा करीत आहोत. ही मागणी तडीस नेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सर्वानी गट-तट, पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, अशी हाक राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी, भामा आसखेड, चासकमान व कलमोडी या चार धरणात सुमारे साडेबारा टीएमसी पाणी विनावापर आणि नियोजनाशिवाय शिल्लक आहे. हे पाणी नजीकच्या अंतरावर असलेल्या उजनी धरणात सोडावे, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यावर त्यांनी पाठपुरावाही चालविला आहे. परंतु त्यावर अद्यापि कोणताही निर्णय झाला नाही. या पाश्र्वभूमीवर अकलूजमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा अग्निप्रदीपन सोहळा संपन्न झाला, त्या वेळी खासदार मोहिते-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. कारखान्याचे संचालक शंकरराव माने-देशमुख व त्यांच्या पत्नी मायादेवी माने-देशमुख यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला.
या वेळी बोलताना खासदार मोहिते-पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लागण्याच्या प्रश्नावर आग्रही भूमिका मांडली. या विषयावर कोणी काहीही बोलले तरी काही फरक पडत नाही. शासनानेच तज्ज्ञ मंडळींच्या देखरेखीखाली हा प्रकल्प तयार केला असून तो कोणीही प्रतिष्ठेचा प्रश्न करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2015 रोजी प्रकाशित
पुणे जिल्ह्यातील पाण्यासाठी सोलापूरकरांनी एकत्र यावे
पुणे जिल्ह्यातील पाणी उजनी धरणात आणण्यासाठी आपण सातत्याने आग्रही पाठपुरावा करीत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
Written by अपर्णा देगावकर

First published on: 30-09-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur come together for water of pune district