पंढरपूरवगळता पवारांविरुद्ध गुन्ह्य़ाचा कुठेही निषेध नाही

सोलापूर : राज्य शिखर बँकेत कर्जवितरण करताना झालेला २५ हजार कोटींचा घोटाळा आणि हवाला प्रकरणी शरद पवार यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केल्याबद्दल राज्यात काही भागातआंदोलन होत असताना एके काळी पक्षाचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा मात्र आज शांत होता. राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी पक्षाला रामाराम ठोकल्याने त्याचा परिणामस्वरूप आजची ही शांतता दिसून आली. दरम्यान, सोलापूर शहरात राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र आचारसंहिता सुरू असताना परवानगीविना त्यांनी हे आंदोलन केल्याने जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल या सर्व आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. या वेळी ही अटक टाळण्यासाठी आंदोलक व पोलिसांत शाब्दिक चकमकही उडाली.

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. मात्र गेल्या वर्षभरात एकामागेएक अशा नेत्यांच्या सोडचिठ्ठीने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार दिलीप सोपल, रश्मी बागल, माजी आमदार जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे अशा एकामागे एक नेत्यांनी राष्ट्रवादीला गेल्या काही दिवसांत सोडचिठ्ठी दिली आहे. याशिवाय माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हेही पक्षावर नाराज असून पक्षांतराच्या मन:स्थितीत आहेत. या पाश्र्वभूमीवर पवारांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावरही जिल्ह्य़ात त्याची तशी फारशी प्रतिकि या उमटली नाही. माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा आदी भागात राष्ट्रवादीत ‘सन्नाटा’ होता.

दरम्यान, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव व कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ मूक धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आचारसंहितेच्या काळात हे आंदोलन केल्यामुळे जमावबंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सर्वाना ताब्यात घेतले. या वेळी आंदोलकांनी स्वत:ची अटक टाळण्याचा प्रयत्न करताना पोलिसांशी वाद घातला.