फेसबुकवरील एका पोस्टवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मंगळवेढ्यात एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी स्थानिक युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षासह दोन नगरसेवकांविरोधात मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवेढ्यात विविध राजकीय नेत्यांचे फेसबुकवर ग्रुप आहेत. यातील एका ग्रुपवर सचिन कलबुर्मे या तरुणाने प्रतिक्रिया दिली होती. यात त्याने मंगळवेढ्याचे सरकार कोण, अशा आशयाचा प्रश्न विचारला होता. या प्रतिक्रियेनंतर सचिन कलबुर्मेचा ग्रुपमधील काही सदस्यांशी वाद देखील झाला होता.
बुधवारी रात्री सचिन कलबुर्मे हा प्रदीप पडवळे, अनंत कुंडलिक चव्हाण व संतोष दिगंबर हजारे या मित्रांसह मुरलीधर चौकात लग्नाची वरात पाहात थांबला होता. यादरम्यान मंगळवेढा युवक काँग्रेसचा माजी अध्यक्ष बाबासाहेब शिवाजी नाईकवाडी याच्यासह नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी व प्रशांत सुभाष यादव हे तिघे तेथे आले. फेसबुकवरील प्रतिक्रियेवरुन झालेल्या वादाच्या रागातून त्या तिघांनी सचिन व त्याच्या मित्रांवर कोयत्याने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सचिनचा मृत्यू झाला. तर प्रदीप हा देखील जखमी झाला. दरम्यान, या घटनेनंतर मंगळवेढ्यात तणावपूर्ण वातावरण आहे.