शासकीय आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी बसविलेले ‘सोलर वॉटर हिटर’ बंद पडले आहेत. त्यामुळे ऐन थंडीत गार पाण्याने अंघोळ करण्याची नामुष्की या आदिवासी विद्यार्थ्यांवर आली आहे. औरंगाबाद येथील माधुरी इंटरप्राईजेसमार्फत हे हिटर पुरविण्यात आले आहेत.
एकात्मिक आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात ११०७ आश्रमशाळा चालविल्या जातात. त्यातील ५५६ शाळा या सामाजिक संस्थांच्या असून ५५१ शाळा सरकारी आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पापैकी नऊ टक्के रक्कम ही आदिवासी विकास विभागावर खर्च होते. या विभागाकडून या ११०७ आश्रम शाळांसाठी हा खर्च केला जातो.
५५१ सरकारी आश्रमशाळांतून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे या उद्देशाने कोटय़वधी रुपये खर्चून हे हिटर बसविण्यात आले होते. हा सर्व खर्च आदिवासी विकास खात्याने केला होता. परंतु काही दिवसातचे हे सोलर वॉटर बंद पडले आहेत.
या हिटरसाठी प्रत्येकी तीन लाख रूपये खर्च करण्यात आला होता. राज्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन प्रकारच्या आश्रमशाळा आहेत. प्राथमिक विभागासाठी दोन, माध्यमिकसाठी तीन आणि उच्च माध्यमिकसाठी चार अशा संख्येनुसार वॉटर हिटर पुरविण्यात आले होते. याबाबत अनेकवार तक्रारी करूनही काहीही कारवाई होत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.